राजा टाईल्स-करंबळ क्रॉस रस्त्याचे काम आराखड्यानुसारच
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते संजय गस्ती यांची माहिती : रस्त्याच्या कामाबाबत शंका असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
खानापूर : शहरांतर्गत असलेल्या राजा टाईल्स ते करंबळ क्रॉस या रस्त्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजूर केलेल्या आराखड्यानुसारच होत आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये. आराखड्याची प्रत मोर्चाच्या वेळी प्रमुख नेत्यांना देण्यात आली आहे. त्या आराखड्यात तरतूद केल्याप्रमाणेच रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसेच रस्त्याच्या कामाचा दर्जा राखण्याची जबाबदारीही सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. त्यासाठी आम्ही जातीनिशी लक्ष घालून रस्त्याचे काम करून घेत आहोत. नागरिकांनी माहिती घेतल्याशिवाय कोणतेही आरोप करू नयेत. ज्यांना संशय आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधून रस्त्याच्या कामाबाबत सूचना कराव्यात, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते संजय गस्ती यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
शहरांतर्गत राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे. मात्र रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांतून अनेक तक्रारी केल्या होत्या. तसेच आठ दिवसापूर्वी मऱ्याम्मा मंदिरपासून राजा टाईल्सपर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण काम हाती घेतल्यानंतर वकील संघटना, म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते मुरलीधर पाटील व काही जागरूक नागरिकांनी रस्त्याच्या डांबरीकरण विरोधात आवाज उठविला होता. आणि अधिकाऱ्यांना जाब विचारुन काम बंद पाडले होते. याबाबत ‘तरुण भारत’नेही दि. 1 डिसेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते संजय गस्ती यांनी ‘तरुण भारत’शी संपर्क साधून या रस्त्याचे बांधकाम आराखड्यानुसारच होत असल्याचे सांगितले.
14 कोटीचा निधी मंजूर
रस्त्याच्या आराखड्याबाबत माहिती देताना ते म्हणाले, राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या 4.5 कि. मी. च्या रस्त्यासाठी 14 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केला आहे. त्यामुळे ते काम सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत होत आहे. रस्त्याच्या आराखड्यात राजा टाईल्स ते रेल्वे ओव्हर ब्रिजपर्यंतचा रस्ता हा डांबरीकरण आणि त्यावर व्हाईट टॉपींग काँक्रीटीकरण करणार आहे. तसेच दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या मुरुम घालून लेवल करण्यात येणार आहे. तर रेल्वे ओव्हरब्रिज ते कोर्टपर्यंत डांबरीकरण तसेच दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या मुरुम घालण्यात येणार आहे. तर कोर्ट ते मऱ्याम्मा मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर डांबरीकरण करून व्हाईट टॉपींग करून 12 इंचाचे काँक्रीटीकरण व दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या मुरुम घालण्यात येणार आहे.
मऱ्याम्मा मंदिर ते हेस्कॉम कार्यालय रस्त्यावर डांबरीकरण करून त्यावर 12 इंचाचे काँक्रीटीकरण आणि व्हाईट टॉपींग करणार आहे. हेस्कॉम कार्यालय ते नदीपुलापर्यंत रस्ता खोदून डीएलसी 6 इंचाचे काँक्रीटीकरण करणार आहे. त्यावर पुन्हा 12 इंचाचे काँक्रीटीकरण करणार आहे. मासळी मार्केटजवळ सीडी करण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी सकल तसेच जमिनीचा भुसभुशीतपणा आहे. त्या ठिकाणी पूर्णपणे काँक्रीटीकरण करून रस्ता करण्यात येणार आहे. तसेच रुमेवाडी क्रॉसजवळील पाणथळ जमिनीच्या रस्त्याची उंची वाढविली आहे.रुमेवाडी क्रॉसजवळील शेतवडीच्या ठिकाणी दुसरी सीडी बांधली असून हा भाग सखल आणि पाणथळ असल्याने येथेही काँक्रीटीकरणाची जाडी वाढविण्यात आली आहे.
साईडपट्ट्यांमुळे 11 फूट रस्ता अधिक वापरात राहणार
राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या समांतर दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या साडेपाच फुटाच्या राहणार असून मुरुम घालून रस्त्याबरोबर करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या मिळून 11 फुटाचा रस्ता अधिक वापरण्यास मिळणार आहे. रस्त्याचे बांधकाम हे आराखड्यानुसार होत आहे. कोणीही गैरसमज करून घेऊ नये, तसेच रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. याची खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी मी स्वत: जातीने लक्ष घालत आहे. तसेच या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली रस्त्याचे काम होत आहे, असे स्पष्टीकरण अभियंते संजय गस्ती यांनी दिले.