For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येळ्ळूर ग्रामपंचायतीने बेकायदेशीर अतिक्रमण हटवून रस्ता केला मोकळा

10:40 AM May 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
येळ्ळूर ग्रामपंचायतीने बेकायदेशीर अतिक्रमण हटवून रस्ता केला मोकळा
Advertisement

सामाजिक कार्यकर्त्याच्या लढ्याला अखेर यश : छत्रपती रोडवरीलही अतिक्रमण हटवण्याची ग्रामस्थांची मागणी

Advertisement

वार्ताहर/येळ्ळूर 

गेले वर्षभर बेकायदेशीर अतिक्रमण विरोधात आवाज उठविणाऱ्या सूर्यकांत नांदुरकर या सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्याला अखेर यश आले. येळ्ळूर परमेश्वरनगर येथील प्रभाग क्रमांक 7 व 8 मधील संत तुकाराम गल्ली व परिसरातील कायदेशीर अतिक्रमणे हटवून मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या गल्लीतील व परिसरातील नागरिकांनी गटारीच्या पुढे तीन ते चार फुटाचे आरसीसी कट्टे करून रस्त्यावर अतिक्रमण केले होते. दोन्ही बाजुंनी निम्मा रस्ता अतिक्रमणात गेल्यामुळे येथील रहिवाशांसह वाहनचालकांना याचा त्रास सोसावा लागत होता. याबाबत सूर्यकांत नांदुरकर यांनी ही अतिक्रमणे हटवण्याबाबत तक्रारअर्ज देवून याचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. पण ग्राम पंचायतीने याकडे दुर्लक्ष केले होते.

Advertisement

त्यामुळे रहिवाशांमध्ये ग्राम पंचायतीच्या अशा कारभाराबद्दल नाराजी व रोष पसरला होता. अखेर या बेकायदेशीर अतिक्रमणाला हटवण्याचा मुहूर्त आज मिळाला आणि या गल्लीने व परिसराने मोकळा श्वास घेतला. वेळाने का होईना पण अतिक्रमण हटविल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे. ग्राम पंचायतीने अशीच तत्परता दाखवत छत्रपती शिवाजी रोडवरील अतिक्रमणे हटवून हा रस्ताही खुला करावा व दररोज होणारी वाहतुकीची कोंडी सोडवावी, अशी ग्रामस्थांची मागणी असून ‘तरुण भारत’मधून याबाबत आवाज उठवला आहे. याही समस्येकडे ग्राम पंचायत गांभीर्याने पाहत लवकरच कार्यवाही करेल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. हे अतिक्रमण हटवण्याचे काम ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून यावेळी प्रभागाचे सदस्य शशीकांत धुळजी, कल्लाप्पा मेलगे, अरविंद पाटील यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.