पिवळा फेटा, हिरवे मफलर; चर्चा मात्र म. ए.समितीची
विधानपरिषदेत सत्ताधारी-विरोधी सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप
बेळगाव : विधानपरिषदेत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांसह काही सदस्य पिवळा फेटा व हिरवे मफलर परिधान करून सभागृहात दाखल झाले. यावर काँग्रेस आमदारांनी आक्षेप घेऊन म. ए. समितीचा फेटा व मफलर का परिधान करून आला आहात, असा प्रश्न उपस्थित केल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. तसेच या विषयावर सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषदेच्या कामकाजाला 11 वाजता सुरुवात झाली. यानंतर प्रश्नोत्तर तासाला सुरुवात झाली. मंगळवारी सरकारच्या धोरणांविरोधात भाजपने थेट आंदोलन हाती घेतले होते. यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांच्यासह बहुतेक भाजप आमदार आंदोलनस्थळी होते. आंदोलनस्थळावरून सदर नेतेमंडळी थेट सभागृहात दाखल झाले. चलवादी नारायणस्वामी यांच्यासह काही सदस्य पिवळा फेटा परिधान करून खांद्यावर शेतकऱ्यांचे निशाण असलेला हिरवा मफलर टाकून आले होते.
यावर सत्ताधारी पक्षाने आक्षेप घेऊन आपण महाराष्ट्र एकीकरण समितीचा फेटा घालून का आला आहात, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. काँग्रेसचे सदस्य रमेश बाबू यांनी सुरुवातीला फेट्यावर आक्षेप घेऊन म. ए. समितीचा फेटा घालून तुम्ही कसे सभागृहात येऊ शकता, असा प्रश्न विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांना केला. रमेश बाबू यांना पाठिंबा देत सभागृह नेते एन. एस. बोसराजू यांनीही फेट्याबाबत आक्षेप घेतला. तसेच सत्ताधारी सदस्यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केल्याने सभागृहात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. फेट्याबाबत नारायणस्वामी म्हणाले, पिवळा फेटा व हिरवे मफलर केवळ एका संघ-संस्थेचे नसून विविध समाज व संघटनांचे प्रतिक आहे. पिवळा फेटा हा अनेक समाजबांधव परिधान करतात, तर हिरवे मफलर हे शेतकऱ्यांची शान आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी याला राजकीय रंग न देता फेटा व मफलरकडे एक प्रतिक म्हणून पाहावे, असे सांगितले.