मंत्री प्रियांक खर्गे यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
बेंगळूर : 2023 च्या विधानसभा निवडणुकीत कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर मतदारसंघातील निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून न्यायालयाने ग्रामविकास-पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत अश्वत्थराम राठोड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश व न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या पीठाने सोमवारी सुनावणी केली. निवडणूक आयोगाला खोटे जात प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्रे सादर करण्याबरोबरच मोफत गॅरंटी योजनांद्वारे मतदारांना आमिष दाखवून विधानसभा निवडणूक जिंकल्याने प्रियांक खर्गे यांची निवड अवैध ठरवावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. प्रियांक खर्गे यांनी अनुसूचित जात प्रमाणपत्राऐवजी ग्राम पंचायत निवडणुकीसाठी दिलेले जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र सादर केले आहे. ते प्रमाणपत्र 2021 मधील आहे. शैक्षणिक पात्रतेसंबंधीदेखील अयोग्य व बनावट प्रमाणपत्रे सादर केली आहेत. काँग्रेसकडून गॅरंटी कार्डद्वारे मतदारांना आमिष दाखविण्यात आले आहे. ही बाब लाच आणि भ्रष्टाचाराशी समान आहे, असा आरोप अश्वत्थराम राठोड यांनी केला आहे.