बेळगावसह 23 जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’
आज मुसळधार; हवामान खात्याचा अंदाज : कलबुर्गी जिल्ह्यात वीज कोसळल्याने दोघांचा बळी
बेंगळूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. शनिवारी देखील जोरदार पावसाचा अंदाज असून बेळगाव, विजापूर, धारवाडसह 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यात यंदा मान्सूनपूर्व पाऊस सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी बळ्ळारी, गदग, कोप्पळसह काही जिल्ह्यात वीज कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला. कलबुर्गी जिल्ह्यात शुक्रवारी वीज कोसळल्याने दोघांचा बळी गेला आहे. आणखी दोन दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
शनिवारपासून बेंगळूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, बेळगाव, धारवाड, विजापूर, कोलार, चिक्कबळ्ळापूर, हासन, कोडगू, बागलकोट, बिदर, गदग, हावेरी, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर, यादगिरी, चित्रदुर्ग, दावणगेरे, मंड्या, म्हैसूर, तुमकूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. बेंगळूरमध्ये शुक्रवारी सकाळी तापमान अधिक होते. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. रात्री अनेक भागात पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी कलबुर्गी जिल्ह्यातील जेवर्गी येथे 6 से. मी., रद्देवाडगी अरग व विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ येथे प्रत्येकी 5 से. मी. पाऊस झाला. शनिवारीदेखील बेंगळूर शहर आणि ग्रामीण जिल्हा, चिक्कबळ्ळापूर, कोलार, चित्रदुर्ग, बळ्ळारी, रामनगर आणि तुमकूर जिल्ह्यांत ताशी 40 ते 50 कि. मी. वेगाने वारे वाहण्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.