सहा दिवस यलो अलर्ट
पणजी : रविवारी पावसाने जोर धरला आणि सोमवारी मान्सून अधिक सक्रिय बनल्याने संपूर्ण गोव्याला दिवसभरात झोडपून काढल्यानंतर हवामान खात्याने दुपारी ऑरेंज अलर्ट जारी केला. तो आज 22 रोजीही तसाच राहील. त्यानंतरच्या पुढील 6 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला. आजही गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने अनेक भागांना पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. पणजीत सकाळी 8.30 ते रात्रौ 8.30 पर्यंत 2.5 इंच पावसाची नोंद झाली. मान्सून अधिकच सक्रिय बनल्याने रविवारपासून पावसाने जोर धरला. सोमवारी पहाटेपासून गोव्यातील सर्व भागाला झोडपून काढले. हिच अवस्था पुढील दोन ते तीन दिवस राहाण्याची शक्यता आहे. राज्यात सोमवारी मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर दुपारी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा देत सोमवार व मंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला.
गेल्या 24 तासांत राज्यात सरासरी 2 इंच एवढी पावसाची नेंद झाली. एकूण पाऊस 66 इंच झाला आहे. 1 जून ते 21 जुलैपर्यंत एवढा पाऊस पडला. तत्पूर्वी मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात सुमारे 30 इंच पाऊस पडला होता. तसे पाहिल्यास यंदाचा पाऊस आता शतकाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक जवळपास तीन इंच पाऊस म्हापसा केंद्रात नेंदविला. सांगे पावणे तीन इंच, मडगाव, केपे येथे प्रत्येकी 2.50 इंच, मुरगांव, पणजी, धारबांदोडा जवळपास 2 इंच, जुने गोवे पावणे दोन इंच, वाळपई, दाबोळी, प्रत्येकी पावणे दोन इंच, सांखळी सव्वा इंच, तर काणकोण येथे अर्धा इंच पावसाची नोंद झाली. आगामी 48 तासांमध्ये गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यानंतर पुढील 4 दिवसांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार, असा इशारा हवामान खात्याने दिला.