प्रदूषण नियंत्रण मंडळ झाले जागे!
अग्नितांडवात 25 बळी गेल्यानंतर लागले कामाला : किनारीपट्टीतील पर्यटन आस्थापनांची तपासणी सुरु
पणजी : हडफडे येथे बर्च नाईट क्लबमध्ये अग्नितांडवात 25 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागे झाले असून किनारपट्टी भागातील विविध आस्थापनांना मंडळाचे अधिकृत परवाने आहेत की नाहीत, याची तपासणी करण्याचा आदेश या मंडळातर्फे देण्यात आला आहे. तपासणीचे हे काम आठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले असून एकूण सात तालुक्यांतील आस्थापनांची चौकशी होणार आहे.
पेडणे, बार्देश, तिसवाडी, मुरगांव, सालसेत, केपे, काणकोण या तालुक्यातील किनारपट्टी भागातील आस्थापनांची चौकशी हे आठ अधिकारी करणार आहेत. या तालुक्यांमध्ये अंदाजे 1500 च्या आसपास पर्यटनाशी संबंधित विविध आस्थापने आहेत. त्या सर्व आस्थापनांना मंडळाचे परवाने आहेत काय? याची तपासणी होणार आहे.
यापैकी काही आस्थापने पाडण्याचे आदेश मंडळाने दिले होते तसेच काही आस्थापनांना टाळे (सील) ठोकण्यासही बजावले होते. त्यांचे काय झाले? याची चौकशी ते अधिकारी करणार आहेत. त्यातूनच महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मंडळाच्या परवान्यांशिवाय किती आस्थापने बेकायदेशीर कार्यरत आहेत आणि परवान्यांचे नूतनीकरण न करता किती आस्थापने सुरु आहेत याचाही तपास करण्याची जबाबदारी त्या आठ जणांवर सोपवण्यात आली आहे. येत्या 25 डिसेंबरपर्यंत तो अहवाल सादर करण्याची सूचना मंडळाने त्यांना दिली आहे.
चौकशी अहवालास लागणार आणखी वेळ
‘बर्च’ क्लबमधील अग्नितांडवासंबंधी चौकशी अहवाल तयार करुन तो सरकारला सादर करण्यास उशीर होणार असल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी असलेले व न्यायदंडाधिकारी असलेले चौकशी समितीचे अध्यक्ष अंकीत यादव यांनी दिली आहे. सरकारने समितीला आठवड्याची दिलेली मुदत संपुष्टात आल्यामुळे यादव यांनी वरीलप्रमाणे खुलासा केला आहे. हडफडेचे सरपंच रोशन रेडकर तसेच जमिनीचे मूळ मालक प्रदीप घाडी आमोणकर व सुनिल दिवकर यांची चौकशी करण्यात आली आहे. कागदपत्रे, परवाने यांची पाहणी, तपासणी आणि पडताळणी सुरु असून त्यातील चौकशीकरीता आणखी काही दिवस लागणार आहे. हे सर्व काम पूर्ण झाल्यावरच अहवाल तयार करणे व सादर करणे शक्य होणार आहे.
लुथरा बंधूंच्या तब्बल 42 बनावट कंपन्या?
बर्च नाईट क्लबला आग लागून 25 जणांचे बळी गेल्यानंतर देशातून पळून थायलँडला गेलेल्या सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या दिल्लीतील एकाच पत्त्यावर तब्बल 42 बनावट कंपन्या आहेत. या कंपन्या केवळ कागदावरच आहेत. 2590, तळ मजला, हडसन लायन, उत्तर पश्चिम दिल्ली या पत्यावर या सर्व 42 कंपन्या नोंदणीकृत आहेत. लुथरा बंधू या बनावट कंपन्यांचे संचालक तसेच भागीदार असल्याचे कॉर्पोरेट नोंदीनुसार दिसून आले आहे. अशा कंपन्यांचा वापर सर्वसाधारणपणे बेनामी व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जातो, याबाबत सखोल चौकशी होणे बाकी आहे.