बेळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
परतीच्या पावसामुळे नागरिक हैराण : बेंगळुरात अनेक भागांना तलावाचे स्वरुप
बेंगळूर : गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. उत्तर आणि दक्षिण कर्नाटक भागातील काही जिल्ह्यांमध्ये 21 ऑक्टोबरपर्यंत पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी बेळगावसह कारवार, धारवाड, हावेरी, गदग, मंगळूर, उडुपी या सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मुसळधार पावसाविषयी राज्य हवामान विभागाचे तज्ञ सी. एस. पाटील यांनी माहिती दिली आहे. बेळगावसह सात जिल्ह्यांसाठी शुक्रवार आणि शनिवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर तुमकूर, शिमोगा, हासन, चिक्कमंगळूर या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. चिक्कमंगळूर, चिक्कबळ्ळापूर बेंगळूर, शहर, बेंगळूर ग्रामीण, म्हैसूर, मंड्या, हासन या जिल्ह्यांमध्येही पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
बेंगळुरात अनेक भागांना तलावाचे स्वरुप
जोरदार पावसामुळे बेंगळूरमधील जनता मागील चार दिवसांपासून हैराण झाले आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाने उसंत घेतली असली तरी पुन्हा पावसाचे चिन्ह आहे. हवामान विभागाने 21 ऑक्टोबरपर्यंत पावसाचे संकेत दिले आहेत. सातत्याने पावसाने झोडपल्यामुळे बेंगळूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरी वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. अनेक भागात झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे, विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने महादेवपूर, सर्जापूर आणि यलहंका परिसरात पावसाचे पाणी तुंबल्यामुळे तलावसदृश चित्र निर्माण झाले आहे.
सरकारवर टिकांचा भडिमार
मागील चार दिवसांपासून बेंगळुरात कोसळत असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. यावरून भाजप आणि निजद नेत्यांनी सरकारवर टिकांचा भडिमार केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, अर्धवेळ बेंगळूर विकासमंत्री असणारे डी. के. शिवकुमार यांचा रस्त्यांवरील ख•s बुजविण्याची कार्यपद्धती एकाच पावसात नजरेसमोर आली आहे. महादेवपूर येथे पाण्यात बुडालेली दुचाकी बाहेर काढण्याचे दृश्य पाहिल्यास काँग्रेस सरकारच्या काळात बेंगळूरची अवस्था कोणत्या अधोगतीपर्यंत पोहोचली आहे हे दिसून येते. निजद नेते एच. डी. कुमारस्वामी म्हणाले, बेंगळूरमधील परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. बेंगळुरात मागील चार दिवसांपासून सातत्याने पाऊस होत असून मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. राज्यात काही ठिकाणी पीकहानी झाली आहे. मात्र, नुकसानग्रस्त भागाला अद्याप कोणत्याही मंत्र्याने भेट देऊन जनतेच्या समस्या जाणून घेतलेल्या नाहीत. यावरून सरकारला जनतेची काळजी नसल्याचे स्पष्ट होत आहे, अशी टीका कुमारस्वामी यांनी केली आहे.
कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’
बेंगळुरात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे आयटी-बीटी कंपन्यांसह विविध ठिकाणी काम करणाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. खराब हवामानामुळे यलहंका, महादेवपूरसारख्या भागात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कर्नाटक इनोव्हेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी सोसायटीने (क्विट्स) आयटी-बीटी कंपन्यांना उद्देशून सल्ला देणारे पत्र जारी केले आहे. याची दखल घेत अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सूचना दिली आहे.