येळापूरच्या युवकाचा जीबीएसने मृत्यू
कोकरुड :
येळापूर (ता. शिराळा) येथील युवक मारुती सर्जेराव मोहिते (वय 19) याचा जीबीएस या आजाराने पुणे येथे उपचार सुरु असताना शनिवारी सकाळी मृत्यु झाला. पश्चिम भागातील जीबीएसचा पहिला रुग्ण गमावल्याने लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मारुती मोहिते हा चार महिन्यापूर्वी पुणे येथे एका ऑनलाइन कंपनीमध्ये लागला होता. येळापुरहुन प्रथमच तो नोकरीसाठी बाहेर पडला होता. नोकरीचे दोन महिने भरले होते. पुणे येथेच दोन महिन्यापूर्वी नोकरीवर असताना अचानक त्याला ताप, सांधेदुखीसारखा त्रास झाल्याने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता त्याची जीबीएस टेस्ट पॉझिटीव्ह आली होती.
त्यावर गेल्या दोन महिन्यापासून उपचार सुरु होते. आज सकाळी त्याचा उपचार सुरु असताना मृत्यु झाला. मारुती हा मेहनती होता. घर बांधायचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो दोन महिन्यापूर्वी पुणे येथे नोकरीस गेला होता. अल्प वयातच मृत्यू झाल्यामुळे लोकांच्यातून दु:ख व्यक्त होत आहे.