Solapur : येळकोट... येळकोट... जय मल्हार'च्या जयघोषात चंपाषष्टी उत्साहात!
सोलापूरच्या बाळे खंडोबा देवस्थानात चंपाषष्टी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा
सोलापूर : महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र बाळे खंडोबा देवस्थानात चंपाषष्टीचा पारंपरिक उत्सव यंदा अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा झाला.
बुधवारी (दि. २६) पहाटे ५ वाजता 'श्रीं' च्या पवित्र मूर्तीचा अभिषेक, महाआरती आणि नैवेद्य अर्पणाने उत्सवाची मंगल सुरुवात झाली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी ग्रामस्थांनी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करत 'जय मल्हार' जयमल्हारचा जयघोष केला.
यावेळी मंदिर परिसर जयघोषाने दुमदुमून गेला. दिवसभर मंदिरात जागरण गोंधळ, पटवसारी, कोटंबा भरणे, बारू सोडणे अशा पारंपरिक धार्मिक विधी पार पडले.. तसेच भक्तिगीतांचा आणि हल्ली-घाल्लींच्या तालावर निनादणाऱ्या ढोल-ताशांचा दणादणाटामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करत होता.
सायंकाळी 'श्रीं' ची पालखी मिरवणूक भव्य जल्लोषात गाव प्रदक्षिणेस निघाली. देवाचा पारंपरिक घोडा, मानाचे नंदी, कोल्हे व विविध पारंपरिक मानाच्या झेंड्यांसह सजलेला ताफा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरला. गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर पार पडलेला लंगर तोडण्याचा विधीही भाविकांच्या मोठ्या गर्दीत आणि मोठ्या श्रद्धेत पार पडला.