एरो शोसाठी यलहंका हवाई तळ सज्ज
आजपासून 15 व्या एरो इंडिया शोला प्रारंभ : ‘सुखोई एसयु-57ई’ यंदाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू
प्रतिनिधी/ .बेंगळूर
आजपासून 15 व्या आवृत्तीच्या एरो इंडिया शोला प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, मालवाहू विमाने, हलकी प्रशिक्षण विमाने आणि लष्करी गुप्त ऑपरेशन विमानांनी जोरदार सराव केला आहे. तीन दिवस यलहंका हवाई तळावर प्रेक्षकांना विविध विमाने पाहण्यास मिळणार आहेत.
‘रन टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज’ या ब्रँड मिशनसह यलहंका हवाई तळावर 5 दिवस आयोजित करण्यात आलेल्या आशियातील सर्वात मोठ्या एरो शोने यावेळी अनेक विक्रमी अपेक्षा निर्माण केल्या आहेत. या मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी यलहंका हवाई तळ सज्ज असून देश-विदेशातील मान्यवर एरो शोसाठी येणार आहेत. आपली क्षमता दाखविण्यासाठी देशी-विदेशी हवाई दलाची विमाने सज्ज झाली आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याहस्ते सदर एरो शोला चालना मिळणार आहे. एरो-शोचे पहिले तीन दिवस म्हणजेच 10, 11 आणि 12 फेब्रुवारी हे संरक्षण संबंधित व्यावसायिक दिवस असतील. 13 आणि 14 तारखेला नागरिकांना शो पाहण्यासाठी संधी देण्यात आहे. एरो शोमध्ये एरोस्पेस क्षेत्रातील लष्करी प्लॅटफॉर्मच्या मोठ्या श्रेणीच्या साहित्यांचे प्रदर्शन होणार आहे.
यापूर्वीच 700 हून अधिक प्रेक्षकांनी नावनोंदणी केली आहे. संरक्षण प्रणालीशी संबंधित त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. एरो शोमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवस्था केली आहे.
रशियाचे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान ‘सुखोई एसयु-57ई’ हे यावषीच्या एरो इंडिया 2025 साठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असून यापूर्वीच हे विमान यलहंका हवाई तळावर उतरले आहे. पारंपारिक लढाऊ विमानांपेक्षा अधिक क्षेपणास्त्रे आणि युद्धास्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या एसयु-57 चे बेंगळुरमध्ये प्रदर्शन होत असल्याचे विशेष आहे.