For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिमागास समुदायातील स्वामीजी ‘डीकें’च्या पाठिशी

10:34 AM Dec 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
अतिमागास समुदायातील स्वामीजी ‘डीकें’च्या पाठिशी
Advertisement

राज्य राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला पुन्हा उत

Advertisement

बेंगळूर : राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून निर्माण झालेला गोंधळ तात्पुरता दूर झाला आहे. असे असले तरी राजकीय वर्चस्वासाठी असणारी रस्सीखेच कायम आहे. प्रणवानंद स्वामीजी यांच्या नेतृत्त्वाखाली अतिमागासवर्गातील 11 स्वामीजींच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा चर्चेला उत आला आहे. बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानाला भेट देऊन स्वामीजींच्या शिष्टमंडळाने शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवावे, अशी इच्छा व्यक्त करून पाठिंबा दर्शविला. तसेच बेंगळूरमध्ये अतिमागासवर्गाचा मेळावा भरवावा, अशी मागणीही शिवकुमारांकडे करण्यात आली.

शिवकुमार यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रणवानंद स्वामीजी म्हणाले, डी. के. शिवकुमार हे राज्याचे मुख्यमंत्री बनण्यास योग्य व्यक्ती आहेत. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदावर बसविण्यास विलंब करू नये. आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. शिवकुमार मुख्यमंत्री बनावेत अशी मागणी असून तशी पात्रता त्यांच्याजवळ आहे. काँग्रेस हायकमांडने यापूर्वी दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement

अतिमागास समुदायांवर अन्याय झाला आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्याने आमच्या बाजूने काम केलेले नाही. त्यामुळे आम्ही अनिवार्यपणे डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली आहे. शिवकुमार यांनी कष्ट आणि दु:ख सहन केले आहे. काँग्रेस पक्षासाठी ते तुरुंगातही गेले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला द्यावा. सिद्धरामय्या हे देखील नेते आहेत, यावर आक्षेप नाही. मात्र, इथे मुख्यमंत्री बदलाची चर्चा आम्ही निर्माण केलेली नाही. त्यामुळे गेंधळ दूर करावा, अशी मागणी प्रणवानंद स्वामीजींनी केली.

अहिंद समुदायाच्या भूमिकेकडे लक्ष

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपद शाबूत राखण्यासाठी ‘अहिंद’ (अल्पसंख्याक, मागासवर्ग, दलित) समुदायाच्या नेत्यांचा पाठिंबा मिळविला आहे. अहिंद समुदायाशिवाय काँग्रेसला भवितव्य नाही, अशी जाणीव हायकमांडला करून देण्यासाठी सिद्धरामय्या यांनी समर्थक नेत्यांमार्फत मोर्चेबांधणी केली आहे. असे असताना अतिमागास समुदायाच्या स्वामीजींनी डी. के. शिवकुमार यांना उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता अहिंद समुदायाच्या भूमिकेविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

सतीश जारकीहोळींशी राज्य, पक्षाच्या मुद्द्यावर चर्चा!

गुरुवारी रात्री एका विवाह समारंभात माझी आणि सतीश जारकीहोळी यांची भेट झाली ही बाब सत्य आहे. आम्ही राज्य आणि पक्षाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. सतीश जारकीहोळी आणि मी एकमेकांचे सहकारी आहे. आम्हाला शत्रूप्रमाणे का पाहता, अशा प्रश्न उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला. गुरुवारी केआयएडीबीच्या नूतन कार्यालयाजवळ पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी ही प्रतिक्रिया दिली. आम्ही दुपारी मंत्रिमंडळ बैठकीत असतो, रात्री जेवणासाठी भेटतो, सकाळी नाश्त्यासाठी एकत्र जमतो. या सर्व गोष्टी सामान्य आहेत. राजकारणात मैत्री, नातेसंबंध असतातच. मी मंत्री एम. बी. पाटील यांच्याशी तासभर चर्चा केली आहे,असेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.