येडियुराप्पांची दिल्लीला धाव
पुत्राच्या राजकीय भवितव्यासाठी हालचाली
बेंगळूर : भाजपमधील असंतुष्ट नेत्यांच्या गटाने प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्त्वाला पुन्हा विरोध दर्शविला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी थेट आखाड्यात उडी घेतली आहे. कोणत्याही अधिकृत कार्यक्रमाचे निमंत्रण नसले तरी येडियुराप्पांनी अचानक दिल्लीला धाव घेतल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. दिल्लीत भाजपश्रेष्ठींची भेट घेऊन कर्नाटकातील राजकीय घडमोडींसंदर्भात ते माहिती देतील. तसेच विजयेंद्र यांच्या समर्थनार्थ मोर्चेबांधणी करणार असल्याचे समजते. याच दरम्यान ते कर्नाटकात मुख्यमंत्रिपदावरून सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्या गटात सुरू असलेल्या संघर्षाविषयी भाजपश्रेष्ठींना माहिती देतील.
राजकीय परिस्थितीबाबत वरिष्ठांना अहवाल शक्य
कर्नाटकातील राजकीय परिस्थितीबाबत विस्तृत अहवाल देण्याची तोंडी सूचना काही दिवसांपूर्वी दिल्लीतील वरिष्ठांनी दिली होती. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेवरून येडियुराप्पा दिल्लीला गेल्याचेही सांगण्यात आले आहे. आमदार रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपमधील असंतुष्ट नेत्यांच्या गटाकडून विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असणाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी वरिष्ठांकडे केली जात आहे. राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास अगरवाल यांच्यासह अनेक नेत्यांची या गटाने दिल्लीत भेट घेतली आहे. त्यामुळे मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी येडियुराप्पांनी दिल्लीला धाव घेतल्याचे सांगितले जात आहे. भाजपमध्ये दिल्ली दरबारी येडियुराप्पांच्या शब्दाला अजूनही वजन आहे. कर्नाटकात कोणत्याही क्षणी भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता गृहीत धरून येडियुराप्पांनी आपल्या प्रभावाचा वापर करण्याची तयारी चालविली आहे.