येडिंच्या पुत्राला प्रदेशाध्यक्षपद
बी. वाय. विजयेंद्र राज्य भाजपचे नवे सारथी : हायकमांडकडून नेमणूक
प्रतिनिधी/ बेंगळूर
मागील सहा महिन्यांपासून दुर्लक्षित झालेल्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांनी शुक्रवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. याद्वारे लिंगायत समुदायाला प्राधान्य देत आगामी लोकसभा निवडणुकीत अधिक जागा जिंकण्याची रणनीती भाजपने आखली आहे.
भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांचा कार्यकाळ अलीकडेच पूर्ण झाला आहे. राज्यात विधानसभा निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याची वर्णी लावण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्य भाजपमधील काही नेत्यांमध्ये राजकीय मुद्द्यांवर एकमत होत नव्हते. शिवाय लोकसभा निवडणूक जवळ येत असताना पक्षाचे नेतृत्त्व कोणाकडे सोपवावे, याविषयी गोंधळ निर्माण झाला होता. अखेर बी. वाय. विजयेंद्र या युवा नेत्याच्या हाती राज्य भाजपची सुत्रे सोपविण्यात आली आहेत.
प्रदेशाध्यक्षपदासाठी केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे, माजी मंत्री सी. टी. रवी, आर. अशोक यांच्यासह अनेक जण शर्यतीत होते. काही दिवसांपूर्वी शोभा करंदलाजे यांनी राज्य राजकारणात येणार नसल्याचे सांगून प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. त्यामुळे विजयेंद्र यांचा मार्ग सुकर झाला. यापूर्वी विजयेंद्र यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्षपदासाठी दबाव आणला होता. तरी सुद्धा पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्षपदासाठी नियुक्ती करण्यास विलंब केला. याचे पडसाद अधूनमधून उमटत होते.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याला संधी देण्याची मागणी झाली होती. निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी नेमणूक न झाल्याने सत्ताधारी काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली. त्यामुळे राज्य भाजप नेत्यांची कोंडी होत होती. आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचार करून हायकमांडने विजयेंद्र यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली आहे.
विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निजद सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, एस. एम. कृष्णा, डी. व्ही सदानंदगौडा, केंद्रीयमंत्री निर्मला सितारामन, राजीव चंद्रशेखर यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
विरोधी पक्षनेता निवड बाकी
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमधील काही आमदारांनी लॉबिंग केली होती. परंतु, हायकमांडने या पदावरही नेमणूक केली नाही. विधिमंडळाचे मागील अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडले होते. या पदावर आमदार डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण आणि आर. अशोक यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठी कुणावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवतात, याकडे राज्य भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे.
लिंगायत मतदारांना वळविण्याचा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीवेळी राज्य भाजपमधील अनेक लिंगायत नेत्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. येडियुराप्पा यांना वरिष्ठांच्या सूचनेवरून निवडणूक राजकारणातून निवृत्त व्हावे लागले होते. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनाही डावलण्यात आले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी पक्षांतर केले. याचा परिणाम लिंगायत समुदायातील मतदार नाराज झाले होते. आता लिंगायत समुदायातील विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले असून लोकसभा निवडणुकीत मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.