For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News: पानीवचे सुपुत्र जवान यशवंत बाबर यांना वीरमरण, कोची येथे कार्यरत

06:05 PM Jul 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
solapur news  पानीवचे सुपुत्र जवान यशवंत बाबर यांना वीरमरण  कोची येथे कार्यरत
Advertisement

त्यांच्या निधनामुळे पानीव गावासह संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोककळा पसरली

Advertisement

By : चैतन्य उत्पात

पानीव : माळशीरस तालुक्यातील पानीव गावाचे सुपुत्र व भारतीय लष्करातील जवान हवालदार यशवंत भानुदास बाबर (वय ५५) यांना रविवारी (ता. २० जुलै २०२५) मध्यरात्री १ वाजता कोची (केरळ) येथे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वीरमरण प्राप्त झाले.

Advertisement

गेल्या ३५ वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत असलेले यशवंत बाबर सध्या कोची येथील संरक्षण सुरक्षा दलात कार्यरत होते. देशसेवेच्या पवित्र कार्यात तन-मनाने समर्पित राहून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण केले. त्यांच्या निधनामुळे पानीव गावासह संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने गाव एक शूर, निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष सैनिक गमावला आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा आप्तपरिवार आहे. बाबर कुटुंबावर या दुःखद घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी सकाळी कोची येथील लष्कराच्या मुख्य कार्यालयात त्यांना लष्करी मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचेल तिथून लष्करी वाहनाने मध्यरात्रीपर्यंत पानीव गावात दाखल होणार आहे.

बुधवारी सकाळी १० वाजता लष्करी इतमामात पानीव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, पानीव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने याबाबतची सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रकाश पाटील यांनी दिली. हवालदार यशवंत बाबर यांच्या अतुलनीय सेवेबद्दल संपूर्ण गावकऱ्यांना अभिमान आहे. त्यांच्यावरील ही अपार दु:खद घटना सर्वांसाठी अत्यंत वेदनादायक आहे.

वीर जवान यशवंत बाबर यांचा सैनिकी प्रवास

  • जम्मू व काश्मीर येथे सलग १५ वर्षे देशसेवा करत देशाच्या संवेदनशील आणि सीमेवरील भागात त्यांनी अत्यंत धैर्याने सेवा बजावली.
  • त्यानंतर जैसलमेर (राजस्थान) येथे शुष्क सीमाभागात
  • पुणे (महाराष्ट्र) येथे प्रशिक्षण व प्रशासकीय जबाबदाऱ्या
  • सिकंदराबाद (आंध्रप्रदेश) येथे दक्षिण भारतात
  • जबलपूर (मध्यप्रदेश) येथे मध्य भारतात या विविध भागांमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले.
  • केवळ दोन महिन्यांपूर्वीच त्यांची बदली कोची (केरळ) येथे झाली होती, जिथे त्यांनी 1307 DSC PL OSS मध्ये सेवा बजावत होती.
  • विशेष म्हणजे, येणाऱ्या एका वर्षातच त्यांची लष्करातून सेवानिवृत्ती होणार होती. परंतु त्याआधीच ड्युटीवर असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले.
Advertisement
Tags :

.