For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यशस्वी जैस्वालचा ‘वनडे स्टाईल’ शतकी धमाका

06:59 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
यशस्वी जैस्वालचा  ‘वनडे स्टाईल’ शतकी धमाका
Advertisement

भारत वि इंग्लंड, तिसरी कसोटी : ‘यशस्वी’ खेळीनंतर जैस्वाल रिटायर्ड हर्ट, गिलचीही अर्धशतकी खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ राजकोट

भारत व इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालची जबरदस्त शतकी खेळी व शुभमन गिलने नाबाद अर्धशतक झळकावत टीम इंडियाला सामन्यात वापसी करुन दिली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 51 षटकांत 2 बाद 196 धावा केल्या होत्या. भारताकडे आता 322 धावांची भक्कम आघाडी आहे. दरम्यान, यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात शतक झळकावले खरे पण त्यानंतर तो पाठीच्या समस्येशी झुंजताना दिसला. त्याला मदत करण्यासाठी भारतीय फिजिओ दोनदा मैदानात आले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि शेवटी त्याला मैदान सोडावे लागले. तिसऱ्या दिवसअखेरीस गिल 65 तर कुलदीप यादव 3 धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला.

Advertisement

प्रारंभी, इंग्लंडने तिसऱ्या दिवशी 2 बाद 207 धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. पण पहिल्या सत्रातच जो रुटला 10 धावांवर जसप्रीत बुमराहने झेलबाद केले. यानंतर पुढच्याच षटकात जॉनी बेअरस्टो शुन्यावर बाद झाला. शतकवीर बेन डकेटने आपला आक्रमक अंदाज तिसऱ्या दिवशीही कायम ठेवला. त्याने 151 चेंडूत 23 चौकार व 2 षटकारासह 153 धावा फटकावल्या. दीडशतकानंतर मात्र तो आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. डकेट बाद झाल्यानंतर उर्वरित इंग्लिश फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. कर्णधार बेन स्टोक्सने 41 धावांचे योगदान दिले पण जडेजाने त्याला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने इंग्लिश फलंदाज बाद होत गेल्याने त्यांचा डाव 71.1 षटकांत 319 धावांवर संपुष्टात आला व भारताला 126 धावांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे, इंग्लंडने अवघ्या 20 धावांत अखेरचे पाच फलंदाज गमावले. यातील चार बळी सिराजने घेतले. याशिवाय कुलदीप आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बुमराह व अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

यशस्वी जैस्वालचे शानदार शतक

126 धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी 30 धावांची सलामी दिली. 19 धावांवर रोहितला जो रुटने पायचीत करत भारताला पहिला धक्का दिला. रोहित बाद झाल्यानंतर जैस्वाल व शुभमन गिलने डावाची सूत्रे आपल्याकडे घेतली. जैस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई करताना गिलसोबत 155 धावांची भागीदारी रचली. सुरुवातीला जैस्वालने सावध सुरूवात केली. 80 बॉलमध्ये यशस्वीने 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर मात्र त्याने आक्रमक फलंदाजी करत बॉलर्सवर प्रेशर आणले. 49 बॉलमध्ये यशस्वीने 75 धावांनी खेळी केली अन् कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकले. शतकानंतर मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे यशस्वीला मैदान सोडावे लागले. त्याने 133 चेंडूत 9 चौकार व 5 षटकारासह 104 धावांचे योगदान दिले. यशस्वी मैदानाबाहेर गेल्यावर शुभमन गिलने मोर्चा सांभाळला अन् धावांचा आकडा कायम ठेवला. गिलने अर्धशतक झळकावताना 120 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह नाबाद 65 धावा केल्या. चौथ्या क्रमाकांवर फलंदाजीला आलेल्या रजत पाटीदारला भोपळाही फोडता आला नाही. त्याला हार्टलीने बाद केले. दिवसअखेरीस शुभमन गिल व कुलदीप यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 51 षटकांत 2 बाद 196 धावा केल्या होत्या.

द्विशतकानंतर वादळी शतक, यशस्वीची तुफान फटकेबाजी

राजकोट कसोटीत युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आपल्या अनोख्या अंदाजात शानदार शतक झळकावले. त्याचे हे कसोटीतील तिसरे शतक ठरले. विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत त्याने कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले होते. विशेष म्हणजे, या शतकी खेळीसह त्याने अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली. यशस्वीने कसोटी करिअरच्या 13 डावात 62.25च्या सरासरीने आणि 65.87च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे. भारताकडून कसोटीत पहिली 3 शतके वेगवान करणाऱ्या विरेंद्र सेहवाग आणि संजय मांजरेकर यांच्या यादीत यशस्वीने स्थान मिळवले आहे. सेहवाग व मांजरेकर यांनी 13 डावात तीन वेगवान शतके झळकावली होती.

अश्विनची तिसऱ्या कसोटीतून माघार

इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना सुरु असताना भारताचा दिग्गज फिरकीपटू आर.अश्विनने या सामन्यातून माघार घेतली आहे. अश्विनच्या आईची प्रकृती बिघडली असल्यामुळे तो या सामन्यातून बाहेर पडला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. या कठीण काळात बीसीसीआय त्याच्या पाठीशी असल्याचेही सचिव जय शाह यांनी म्हटले आहे.

संक्षिप्त धावफलक : भारत पहिला डाव 445 व दुसरा डाव 51 षटकांत 2 बाद 196 (यशस्वी जैस्वाल 104 रिटायर्ड, रोहित शर्मा 19, रजत पाटीदार 0, गिल खेळत आहे 65, कुलदीप खेळत आहे 3, जो रुट व हार्टली प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.