यशस्वी जैस्वाल पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये
वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या नव्या मानांकनात पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये स्थान मिळविले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने फलंदाजीत सातशेच्या जवळपास धावा जमवित जबरदस्त फॉर्म दाखविला आहे.
2023 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या जैस्वालने दोन स्थानांची झेप घेत 727 रेंिटंग गुणांसह दहावे स्थान मिळविले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सहाशेहून धावा जमवित निवडक फलंदाजांच्या यादीत त्याने याआधीच स्थान मिळविले आहे. असा पराक्रम करणारा भारताचा तो एकमेव डावखुरा फलंदाज आहे. एका कसोटी मालिकेत सहाशेहून अधिक धावा जमविणारा तो भारताचा पाचवा फलंदाज आहे. याआधी सुनील गावसकर, दिलीप सरदेसाई, राहुल द्रविड व विराट कोहली हा बहुमान प्राप्त केला आहे. या मालिकेत त्याने 93.57 धावांच्या सरासरीने दोन अर्धशतके व दोन द्विशतकांसह 655 धावा फटकावल्या आहेत. मालिकेत सर्वाधिक 774 धावा जमविण्याचा गावसकर यांचा विक्रम मोडण्याची त्याला चांगली संधी आहे.
राजकोटमधील तिसऱ्या कसोटी 131 धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माने 11 व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यानेही दोन स्थानांची प्रगती केली आहे. या मालिकेत सहभागी न झालेला विराट कोहलीही एका स्थानाने वर सरकला असून तो आता आठव्या स्थानावर आहे. अव्वल तीन क्रमांक मिळविणाऱ्या फलंदाजांत इंग्लंडच्या जो रूटने स्मिथला मागे टाकत दुसरे स्थान घेतले आहे. रूटने रांचीतील चौथ्या कसोटीत शानदार शतक नोंदवले होते. स्टीव्ह स्मिथला सलामीला पाठवल्यापासून त्याला अद्याप मोठी धावसंख्या नोंदवता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनचा फॉर्मही हरविला असून त्याची पाच स्थानांनी घसरण झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या वेलिंग्टन कसोटीतील दोन्ही डावांत तो अपयशी ठरला होता.
गोलंदाजांत भारताच्या रवींद्र जडेजा एका स्थानाने घसरला असून तो आता सातव्या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलियाच्या जोश हॅझलवूड व नाथन लियॉन यांनी बढती मिळविली असून ते आताचा चौथ्या व सहाव्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर 172 धावांनी मोठा विजय मिळविला होता.