भारत-न्यूझीलंड अंतिम कसोटी आजपासून
भारतापुढे पत राखण्याचे आव्हान, जागतिक कसोटी स्पर्धेतील अंतिम फेरीच्या शर्यतीत भारताला टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक
वृत्तसंस्था/मुंबई
भारताला अलीकडच्या काळात कधीही नव्हे इतके दोन धक्के पहिल्या दोन कसोटींत बसल्यानंतर आता आज शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत जेव्हा संघ उतरेल तेव्हा त्यांच्यापुढे कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवून आपली पत सांभाळण्याचे लक्ष्य असेल. घरच्या मैदानावर त्यांच्यापुढे सर्वांत मोठे आव्हान प्रतिष्ठा राखण्याचे असेल. मालिकेच्या या अंतिम सामन्यातही फिरकीस पोषक खेळपट्टी पसंत करण्यात आली आहे.
जूनमध्ये लॉर्ड्सवर होणाऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळविण्यासाठी भारताला वानखेडे कसोटी जिंकणे आवश्यक आहे. 2023-25 स्पर्धा कार्यक्रमातील सहा कसोटी बाकी असताना दोन वेळा उपविजेत्या राहिलेल्या भारताला पुन्हा एकदा चषकासाठीच्या शर्यतीत राहण्यासाठी आणखी किमान चार कसोटी जिंकणे आवश्यक आहे. पुण्यातील फिरकीस पोषक खेळपट्टीने भारतीय खेळाडूंना उघडे पाडलेले असले, तरी सध्याच्या संघाच्या तत्त्वज्ञानानुसार, पहिल्या तासापासून चेंडू भरपूर वळू शकेल अशा खेळपट्टीच्या बाजूने कौल देण्यात आला आहे. त्यामुळे आणखी एक सामना तीन दिवसांत समाप्त होण्याची शक्यता आहे.
जाळ्यात सरावासाठी 20 संथ गोलंदाजांना बोलावणे, ऐच्छिक सत्रे रद्द करणे हे 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय फळीत घबराट निर्माण झाल्याची चिन्हे आहेत. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात जोरदार झुंज दिलेली असली, तरी बेंगळूरमध्ये दर्जेदार मध्यमगती गोलंदाजीविऊद्ध भारताच्या नामांकित फलंदाजांनी केलेले खराब प्रदर्शन आणि पुण्यात फिरकीविऊद्ध पत्करलेली शरणागती याने भारताच्या काही सुपरस्टार्ससाठी शेवटाची सुऊवात केली आहे. 46, 156 आणि 245 या धावसंख्या ऑस्ट्रेलियात अधिक आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागण्यापूर्वी भारतीय संघाचे एक खेदजनक चित्र दाखवितात.
कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे चार वरिष्ठ खेळाडू या संकटाला तोंड देण्याच्या दृष्टीने काय करतात हे पाहावे लागणार असले, तरी त्यांच्यावरील भार युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनीही तितक्याच प्रमाणात पेलला, तर त्यांचे काम जास्त सोपे होईल. न्यूझीलंडची तयारी आणि योजनांची जवळजवळ परिपूर्ण अंमलबजावणी यामुळे भारताच्या फलंदाज आणि गोलंदाजांसमोर काही कठीण प्रश्न निर्माण झाले आहेत. अश्विन आणि जडेजा या फिरकी जोडीला 2012 च्या उत्तरार्धात एकत्र वावरण्यास सुऊवात केल्यापासून प्रथमच मायदेशातील कसोटी मालिकेत त्यांना प्रभावहीन बनविण्यात आले आहे. असे असले, तरी पुण्यात 113 धावांनी स्वीकाराव्या लागलेल्या पराभवात भारताचा कर्णधार रोहित आपल्या फिरकीपटूंच्या पाठीशी उभा राहिला.
कसोटी क्रिकेट आक्रमकपणे खेळण्याचे रोहितचे धोरण असले, तरी कर्णधाराने अवाजवी जोखीम पत्करल्याचे दिसून येते. मालिकेच्या पहिल्याच दिवशी सातव्या षटकात टीम साऊदीचा चेंडू पुढे येऊन फटकावण्याच्या भरात त्याने आपली विकेट गमावली. गेल्या दोन कसोटींमध्ये रोहित तीनदा त्रिफळाचीत झालेला असून दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात सँटनरविऊद्ध तो ज्या प्रकारे चेंडू बॅट-पॅडला लागून बाद झाला त्याने आणखी भर टाकली आहे. दुसरीकडे, या मालिकेत भारताचा फलंदाजीतील सुपरस्टार विराट कोहली फूलटॉस हुकून बाद झाल्याचे पाहायला मिळालेले असून त्याच्यावर मोठा डाव खेळण्याचा दबाव वाढत चालला आहे.
भारताच्या फलंदाजांना वानखेडे स्टेडियमवरील फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर कठोर आव्हानाचा सामना करावा लागेल. गोलंदाजीचा विचार करता अश्विन आणि जडेजा घरच्या मैदानांवर धोकादायक दिसलेले नाहीत. त्यामुळे अक्षर पटेल खेळला, तर आश्चर्य वाटणार नाही. हे ठिकाण अरबी समुद्राच्या शेजारी असल्याने सकाळी वारा वाहून आरंभी वेगवान गोलंदाजांना साहाय्य मिळेल. मात्र त्यानंतर खेळपट्टी लवकरच फिरकीपटूंना साथ देईल आणि लाल मातीवर चेंडू भरपूर उसळेल, अशी अपेक्षा आहे. 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्ध मुरली कार्तिकने कहर करून जसे भारताने वापरलेले डावपेच यशस्वी ठरले होते तसेच ते यावेळीही कामी येऊ शकतात. त्यावेळी 20 वर्षांपूर्वी गंभीरने कसोटीत पदार्पण केले होते आणि आता त्याची पुनरावृत्ती घडविण्याची अपेक्षा त्याने बाळगल्यास त्यात आश्चर्य नाही.
भारत-रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शबमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड-टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, मार्क चॅपमन, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र, टॉम ब्लंडेल, एजाज पटेल, मॅट हेन्री, टीम साउदी, विल्यम ओ’रुर्के, जेकब डफी.
सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वा.