यामी गौतमने पूर्ण केले चित्रिकरण
दॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही स्वत:च्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. यामी अलिकडेच अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत ‘ओएमजी 2’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात तिने कामिनी माहेश्वरी (वकील) ची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती लाभली होती. या चित्रपटानंतर यामीने आता स्वत:च्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण संपविले आहे. यासंबंधीची माहिती तिनेच सोशल मीडियावर शेअर केली आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण काश्मीरमध्ये पार पडले आहे. माझ्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वपूर्ण चित्रपटांपैकी एकाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. बी62 स्टुडिओसोबत दिग्दर्शक, निर्मिती टीम आणि आमच्या सहकलाकारांचे आभार मानते, असे तिने नमूद केले आहे. काश्मीरमधील स्थानिक लोक, सुरक्षा दल आणि अधिकाऱ्यांनी पूर्ण चित्रिकरणादरम्यान आमची चांगल्याप्रकारे काळजी घेतली. आम्हाला घरासारखी वागणूक देणाऱ्या श्रीनगरमधील लोकांचे आभार मानते. तसेच तुलमुलामध्ये दिव्य माता खीर भवानीचे आशीर्वाद घेण्याचे सुदैव लाभल्याचे तिने नमूद केले आहे. परंतु यामीने अद्याप चित्रपटाच्या नावाचा खुलासा केलेला नाही. यामीचा हा आगामी चित्रपट पॉलिटिकल थ्रिलर असल्याचे समजते. याचे चित्रिकरण प्रामुख्याने दिल्ली आणि काश्मीरमध्ये पार पडले आहे.