यल्लम्मा देवस्थान आता ऑनलाईन सेवा देणार
सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांची माहिती
वार्ताहर/बाळेकुंद्री
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानचा संपूर्ण विकास करण्यासाठी देवस्थान प्राधिकरणाची रचना करण्यात आली आहे. याव्दारे डोंगरावर येणाऱ्या भाविकांसाठी अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन सौदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांनी केले. ते बुधवारी यल्लम्मा मंदिर विकास प्राधिकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर यल्लम्मा मंदिराच्या सभाभवनात आयोजित केलेल्या सत्कार सभारंभात बोलत होते. आता हे मदिर राज्यातील ए दर्जाचे मंदिर आहे. दरवर्षी 1 कोटी पन्नास लाखाहून अधिक भाविक या ठिकाणी येऊन देवीचे दर्शन घेतात.
माझ्या कार्यकाळात प्राधिकरणाची निर्मीती झाली हे माझे भाग्य मानतो. प्राधिकारमार्फत डोंगरावर आणखी विकासकामे हाती घेतली जातील. आणि भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, निवास आणि स्वच्छतागृहे यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी यल्लम्मा देवी मंदिरात ऑनलाईन सेवा दिली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी नवलगुंदचे आमदार एम. एच. कोनरेड्डी, तहसीलदार मल्लिकार्जुन हेग्गनावर, सीईओ एसबीपी महेश, सिद्दनगौडा गुडराशी, दिपकगौडा पाटील, आर. एस. गौडा पाटील यांनी आमदार विश्वास वैद्य यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.