दीपोत्सवाला नवचैतन्याची झालर
बेळगाव : मांगल्य आणि तेज यांचा संगम असणाऱ्या दीपोत्सवाच्या उत्साही पर्वाला प्रारंभ झाला आहे. सर्व प्रकारच्या काळोखावर मात करून प्रकाशाची प्रेरणा देणारा, अविवेकावर विवेकाने मात करण्याचा, ज्योतीने तेजाची आरती करण्याचा सण म्हणजे ‘दिवाळी’. वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली तरी या सणातील महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. नरकाच्या भयापासून मुक्ती मिळून सन्मार्गाने जीवन जगण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस. नरकासुराच्या मस्तकावर पाय देऊन श्रीकृष्णाने त्याचा नि:पात केला तो हा दिवस. त्यामुळेच या दिवशी कारीट फोडण्याची प्रथा आहे. कारीट हे नरकासुराच्या वधाचे प्रतीक मानले जाते. अभ्यंगस्नान करून कारीट फोडण्याची प्रथा आजही कायम आहे. कारीट फोडल्यानंतर त्याची अतिशय कडू अशी चव जिभेवर ठेवली जाते. जीवनात सर्व काही गोड नसते, तर जीवनात कडू आणि गोड अशा दोन्ही प्रसंगांना सामोरे जावे लागते असेच याच्यातून सूचित करण्यात आले आहे.
वर्षातील सर्व सणांची सम्राज्ञी असा मान दिवाळीला मिळाला आहे. अर्थातच तिच्या स्वागतामध्ये कोणतीही कसर राहणार नाही यासाठी शहरवासियांची लगबग सुरू आहे. बाजारपेठेत अभ्यंगस्नानासाठी सुगंधी उटणे, सुवासिक साबण, विविध प्रकारचे सुगंधी तेल यांची खरेदी झाली आहे. ग्रामीण भागातून कारीट आणि त्याचे वेल घेऊन विक्रेते दाखल झाले आहेत. दिवाळी म्हणजे सोने, कपडे खरेदी ठरलेली. सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी सर्व सराफी पेढ्यांमध्ये व सोने विक्रीच्या शोरुम्समध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स व फोनच्या दुकानांमध्ये सुद्धा गर्दी पाहायला मिळत आहे. तयार फराळाने दुकाने सजली आहेत. भेटवस्तूंच्या अगणित नमुन्यांची रेलचेल झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाला परवडतील अशा भेटवस्तू घेणे शक्य होणार आहे. ड्राय फ्रुट्सच्या बॉक्समध्येही वैविध्य पाहायला मिळत आहे.
बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठी आवक
सणाच्या व लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बाजारपेठेमध्ये फळांची आवक वाढली आहे. शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन साजरे केले जाणार असल्याने लक्ष्मीपूजेसाठी लागणाऱ्या पूजा साहित्याची खरेदी जोरात सुरू आहे. बाजारपेठेमध्ये झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे. ज्यांना सजावटीसाठी अधिक प्रमाणात फुले आवश्यक आहेत. त्यांनी गांधीनगर येथे फूल मार्केटमध्ये जाऊन फुले खरेदी करणे पसंद केले. एकूणच दीपोत्सवाच्या स्वागताची शहरात धूम उडाली आहे.