वाय. एस. शर्मिला यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश; आंध्रात काँग्रेसला मोठं मिळालं बळ
तेलंगणात सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेसला आता आंध्र प्रदेशातही मोठं बळ मिळालं आहे. आंध्रचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांची कन्या शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करता आपल्या भावासमोर आव्हान उभं केलं आहे.
शर्मिला यांनी आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसंच, वायएसआर तेलंगण पार्टी हा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन केला.
वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण करताना मला खूप आनंद होत आहे. वायएसआर तेलंगणा पक्ष आजपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा भाग होणार आहे. काँग्रेस पक्षात जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडेन, असं त्या यावेळी म्हणाल्या. 'राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान म्हणून पाहणं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात माझा सहभाग असेल याचा आनंद आहे, असं शर्मिला म्हणाल्या आहेत.