संरक्षण दलांचे वाढणार सामर्थ्य
1.45 लाख कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी : लढाऊ विमान-रडारचाही समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने सशस्त्र दलांची क्षमतावृद्धी आणि आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) संरक्षण क्षेत्राला मजबूत करण्यासाठी 1.45 लाख कोटी रुपयांच्या 10 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. याच्या अंतर्गत भविष्यासाठी तयार लढाऊ विमाने, एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार, डोर्नियर-228 विमाने, नव्या पिढीच्या वेगवान गस्तवाहनांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या डीएसीच्या बैठकीत 1,44,716 कोटी रुपयांच्या 10 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यातील 99 टक्के खरेदी ही भारतीय आणि स्वदेशी स्वरुपात डिझाइन, विकसित आणि निर्मित श्रेणीच्या अंतर्गत स्वदेशी स्रोताकडून करण्यात येणार आहे.
एफआरसीव्हीच्या खरेदीला हिरवा झेंडा
भारतीय सैन्याच्या टँक फ्लीटच्या आधुनिकीकरणासाठी फ्यूचर रेडी कॉम्बॅट वाहनांच्या (एफआरसीव्ही) खरेदीलाही हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. एफआरसीव्ही हे अधिक वेग गाठू शकणारा, सर्व भागांची क्षमता बाळगणारा आणि अचूक मारा करण्यास सक्षम युद्ध रणगाडा आहे.
एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार
डीएसीच्या बैठकीत एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडारच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. ही यंत्रणा आकाशात लक्ष्याचा शोध घेणे, त्यांना ट्रॅक करणे आणि लक्ष्य करण्यास सक्षम असेल. फॉरवर्ड रिपेयर टीम (ट्रॅक्ड)च्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. हे उपकरण बख्तरबंद वाहन निगम लिमिटेडकडून डिझाइन आणि विकसित करणत आले आहे. तसेच हे मॅकेनाइज्ड इन्फ्रंट्री बटालियन आणि चिलखती रेजिमेंट दोन्हींसाठी मंजूर करण्यात आले आहे.
तटरक्षक दलाचे बळ वाढणार
भारतीय तटरक्षक दलाच्या क्षमता वाढविण्यासाठी तीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. डोर्नियर-228 विमान, खराब हवामानाच्या स्थितीत वेगवान गस्त घालू शकणाऱ्या नौकांच्या खरेदीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे सागरी क्षेत्रात शोध आणि बचाव किंवा मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याची क्षमता वाढणार आहे. बैठकीच्या अखेरीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तटरक्षक दलाचे महासंचालक दिवंगत राकेश पाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पाल यांचे 18 ऑगस्ट रोजी चेन्नईमध्ये हृदयविकाराचा धक्का बसल्याने निधन झाले होते.