झेवियर्स, ज्योती, हेरवाडकर, जोसेफ, डीपी, संत मीरा विजयी
बेळगाव : पोलाईड वर्ल्ड वाईड संघटना व सेंटपॉल्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 57 व्या फादरएडी फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स, ज्योती सेंट्रल, एम. व्ही. हेरवाडकर संघांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर विजय मिळविला.तर मुलींच्या गटात विजय मिळवून प्रत्येकी दोन गुण घेतले. सेंटपॉल्स हॉस्टेल मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सेंट झेवियर्सने इंडस अल्टमचा 9-0 असा पराभव केला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला झेवियर्सच्या सैफुलाने पहिला गोल केला. 19 व्या मिनिटाला युहान खानने दुसरा गोल केला. 29 व्या मिनिटाला झोयाने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 31 व 32 व्या मिनिटाला सैफ मुल्लाने सलग दोन गोल केले. 43 व्या मिनिटाला माहिदने, 45 व्या मिनिटाला रोहनने, 46 व 50 व्या मिनिटाला सलग दोन गोल करून झेवियर्सला विजयी केले. दुसऱ्या सामन्यात ज्योती सेंट्रलने जैन हेरिटेजचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला आर्यनच्या पासवर स्वप्नील पाटीलने गोल केला.
तर 53 व्या मिनिटाला आर्यनने बचावफळीला चकवत दुसरा गोल केला. तर 54 व्या मिनिटाला स्वप्नील पाटीलने तिसरा गोल केला. तिसऱ्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने भरतेश संघाचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव केला. निर्धारीत वेळेत 27 व्या मिनिटाला एम. व्ही. हेरवाडकरच्या अथर्व सोमनाचेने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 31 व्या मिनिटाला भरतेच्या स्वयंम मलिकने गोल करून एक एक अशी बरोबरी करून सामन्यात रंगत निर्माण केली. निर्धारीत वेळेत दोन्ही संघाचे गोलफलक समान राहिल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये हेरवाडकरने 5-4 असा विजय संपादन केला. निशा छाब्रिया चषक मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन सेंट पॉल्सच्या प्राचार्यांच्या हस्ते नाणेफेक करून झाले. पोलाईड वर्ल्ड वाईड संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सेंट जोसेफने गजाननराव भातकांडे स्कूलचा 10-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात डीपी स्कूलने शेख सेंट्रलचा 2-0 असा पराभव केला तर तिसऱ्या सामन्यात संत मीराने जैन हेरिटेजचा 4-0 असा पराभव केला.