व्हेनेझुएलात ‘एक्स’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी
मस्क अन् मादुरो यांच्या वादाची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ काराकास
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 10 दिवसांची बंदी घातली आहे. याचबरोबर मादुरो यांनी एक्सचे मालक एलन मस्क यांच्यासोबतच्या तणावात भर घालणारे पाऊल उचलले आहे. मादुरो हे अलिकडेच पुन्हा अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाले आहेत. या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात येत आहे.
व्हेनेझुएलात अध्यक्षीय निवडणुकीवरून सुरू असलेल्या वादानंतर दक्षिण अमेरिकेतील या देशाने 10 दिवसांसाठी एक्सवर बंदी घातली आहे. नियामक कॉनटेलकडून सादर एका प्रस्तावावर मी स्वाक्षरी केली असून यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे मादुरो यांनी सांगितले आहे.
अध्यक्ष मादुरो यांनी मस्क यांच्यावर द्वेष, गृहयुद्ध आणि हिंसा भडकविल्याचा आरोप केला. मादुरो यांनी अनेकदा एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लक्ष्य केले आहे. तर मस्क यांनी व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांची तुलना गाढवासोबत केली होती. दोघांनीही एक्सवर परस्परांना जाहीर वादविवादाचे आव्हान दिले आहे. तसेच दोघांनीही हे आव्हान स्वीकारले देखील आहे.