गौतम अदानींवर अमेरिकेत दोषारोप
वीजउत्पादन कंत्राटांसाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊ केल्याचा आरोप, अदानींकडून इन्कार
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेच्या एका न्यायालयात भारतील उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचे नातेवाईक सागर अदानी, तसेच अदानी उद्योगसमूहाच्या काही अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवण्यात आला आहे. न्यूर्यार्कच्या या जिल्हा न्यायालयाने अदानी यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. भारतात सौरविद्युतनिर्मितीची कंत्राटे मिळविण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 2 हजार कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अदानींचे संरक्षण करीत असल्याचा आरोप या पक्षाने केंद्र सरकारवर केल्याने या प्रकरणाला राजकीय रंगही प्राप्त झाला आहे. अदानी यांच्यावरील आरोपांमुळे गुरुवारी शेअरबाजारात अदानी उद्योगसमूहाच्या अनेक कंपन्यांचे समभागांची 20 टक्के घसरण झाल्याने गुंतवणूकदारांनी 2 लाख कोटी रुपये गमावले आहेत. अदानी यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत.
न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायालयाने भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी मध्यरात्रीनंतर अदानी यांच्या विरोधात अटक वॉरंट लागू केले. भारतातील काही राज्यांमध्ये सौरऊर्जा निर्मितीसाठी कंत्राटे अदानी यांना हवी होती. त्यासाठी त्यांनी या राज्यांमधील सरकारी अधिकाऱ्यांना साधारणत: 2 हजार कोटी रुपयांची लाच देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, अशी लाच दिली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी विदेशातील ज्या वित्तसंस्थांकडून कर्जे घेतली आहेत, किंवा विदेशात ज्यांना आपले रोखे विकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, त्यांना दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी रोखेधारक आणि कर्ज देणाऱ्या संस्था यांची फसवणूक केली आहे. या कर्जांच्या आणि रोखे विक्रीतून मिळालेल्या रकमेचा उपयोग करुन हा लाच देण्याचा प्रस्ताव अदानी यांनी दिला होता, असा आरोप अमेरिकेत त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अदानींनी फेटाळले आरोप
अदानी यांच्या विरोधात अमेरिकेचा न्याय विभाग आणि अमेरिकेतील रोखे व्यवहार नियंत्रक आयोगाने अभियोग सादर केला आहे. मात्र, अदानी यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. अदानी ग्रीन या अदानी उद्योगसमूहातील कंपनीविरोधात अमेरिकेत ठेवण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि धादांत खोटे आहेत. हे केवळ आरोप असून ते सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. अदानी उद्योगसमूह आपल्या संचालकांच्या विरोधात करण्यात आलेल्या या आरोपांच्या विरोधात आपला बचाव करण्यासाठी समर्थ आहे. यासाठी विधीवत् मार्गाने शक्य ते सर्व उपाय केले जातील. या सर्व आरोपांचा आम्ही सविस्तर आणि ठामपणे इन्कार करत आहोत, असे समूहाने स्पष्ट केले.
काँग्रेसकडून अटकेची मागणी
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी आणि महासचिव जयराम रमेश यांनी गौतम अदानी यांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली. अदानी यांच्या आरोपाची चौकशी संसदेच्या संयुक्त समितीकडून व्हावी, अशी काँग्रेसने केलेली मागणी किती योग्य होती, हे अमेरिकेतील आरोपांवरुन दिसून येते. पण अदानी यांना अटक होणार नाही. कारण त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संरक्षण आहे, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे. गांधी यांनी पत्रकार परिषदेत ही टिप्पणी केली. तसेच आम्ही अदानी यांच्यावर केलेले आरोप सत्य होते हे सिद्ध झाले आहे, असा दावाही केला. आता अदानी यांच्या विरोधात कारवाई केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशा अर्थाचे व्यक्तव्यही काँग्रेसने केले आहे.
कोणत्या राज्यांमधील कंत्राटे...
जी सौरविद्युत निर्मिती कंत्राटे मिळविण्यासाठी अदानी यांनी लाच देऊ केली होती, ती कोणत्या राज्यांमधील आहेत, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ही कंत्राटे ओडीशा, तामिळनाडू, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील होती. हे प्रकरण 2021-2022 मधील आहे. त्यावेळी या सर्व राज्यांमध्ये विरोधी पक्षांचीच सरकारे होती. ओडीशामध्ये बिजू जनता दल, तामिळनाडूत द्रविड मुन्नेत्र कळघम, छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस या पक्षाची सरकारे होती. त्यामुळे हे प्रकरण आता विरोधी पक्षांवरच उलटणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. काँग्रेसने या प्रकरणात सध्याच्या केंद्र सरकारला ओढण्याअगोदर या महत्वाच्या बाबीचा विचार करावा. तसेच आधी अभ्यास करुन मग आरोप करावेत, अशी खोचक टिप्पणीही मालवीय यांनी त्यांच्या संदेशात केली आहे.
अदानी समूहाच्या समभागांना फटका
अमेरिकेतील न्यायालयात अदानी समूहाचे संचालक गौतम अदानी यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांचे गंभीर पडसाद भारतात उमटले आहेत. भारतातील शेअरबाजारांमध्ये अदानी समूहाच्या चार कंपन्यांचे समभाग कोसळले आहेत. त्यांना सरासरी 20 टक्क्यांचा फटका बसला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनाही जवळपास 2 लाख कोटी रुपयांची हानी सोसावी लागली आहे. 2023 मध्ये अमेरिकेतीलच हिंडेनबर्ग या शॉर्ट सेलिंग कंपनीने अदानी समूहावर आरोप केले होते. तेव्हाही असाच फटका बसला होता. मात्र, कालांतराने हे समभाग सावरले होते. आता या समूहाला बसलेला हा दुसरा फटका आहे. या संदर्भात पुढचे काही दिवस अत्यंत महत्वाचे आणि निर्णायक ठरतील अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
अदानी यांच्यासमोर पर्याय काय...
अदानी यांच्या विरोधात अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाने दोषारोप ठेवले आहेत. या आरोपांच्या विरोधात ते तेथील न्यूयॉर्क प्रांताच्या उच्च न्यायालयात आणि नंतर आवश्यकता भासल्यास अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. तसेच अटक वॉरंट मागे घेण्यासाठीही कायदेशीर मार्गाचा अवलंब करु शकतात. त्यांच्या विरोधात कोणते पुरावे आहेत, हे पाहणे या संदर्भात महत्वाचे आहे. पण त्यांना कायदेशीर मार्गांचा पर्याय उपलब्ध आहे, असे काही कायदेतज्ञांचे मत आहे.
अदानी समूह पुन्हा अडचणीत...
- अमेरिकेतील न्यायालयात दोषारोप ठेवल्याने अदानी समूह पुन्हाअडचणीत
- दोषारोपांच्या विरोधात अदानी अमेरिकेतील उच्च न्यायालयात जाणे शक्य
- शेअरबाजारात अदानी समूहाच्या सभभागांना फटका, 2 लाख कोटी हानी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानी यांच्या वाचवित असल्याचा काँग्रेसचा आरोप
- हे प्रकरण विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधीलच : भाजपचा आरोप