महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साहित्यिकांनी सत्याची कास धऊन सौंदर्याचा शोध घ्यावा !

01:08 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कवी घन:श्याम बोरकर यांचे प्रतिपादन : बिल्वदलचे अंत्रुज महाल साहित्य संमेलन उत्साहात

Advertisement

फोंडा : कुठलीही दर्जेदार साहित्यकृती निर्माण होण्यामागे आत्मप्रेरणा लागते. केवळ लेखनासाठी लेकन न करता नवीन साहित्यिकांनी परंपरेला धक्का लावून नाविन्याचा ध्यास घेतला पाहिजे. सत्याची कास धऊन सौंदर्याचा शोध घ्यावा. समाजाच्या मनात शिरुन जगाकडे व्यापक दृष्टीने पाहणाऱ्या लेखकांचे साहित्य काळाच्या कसोटीवर उतरत असते. लेखनामागील हिच खरी प्रेरणा व प्रयोजन आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी घन:श्याम बोरकर यांनी केले.  बिल्वदलतर्फे बोरी येथे आयोजित केलेल्या अंत्रुज महाल मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. येथील श्री नवदुर्गा मंदिरच्या सभामंडपात रविवारी हे एकदिवशीय संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समिक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांच्याहस्ते झाले. स्वागताध्यक्ष तथा श्री नवदुर्गा देवस्थानचे अध्यक्ष श्याम प्रभूदेसाई, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, बिल्वदलचे अध्यक्ष तथा तरुण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर, उपाध्यक्ष राजेंद्र साखरदांडे व सचिव करुणा बाक्रे हे व्यासपिठावर उपस्थित होते. वाचन संस्कृतीपासून तुटत चाललेली नवीन पिढी ही साहित्य क्षेत्रापुढील चिंतेची बाब असल्याचे बोरकर यांनी नमूद केले. त्यासाठी साहित्य संमेलनासारख्या व्यासपिठावरुन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विचारमंथन व कृती कार्यक्रम अपेक्षित आहे. संमेलनामध्ये पुस्तक विक्री प्रदर्शने लावून त्यांची खरेदी झाल्यास साहित्य निर्मितीला प्रेरणा मिळेल. तसेच जगभरातील विविध भाषांमधील दर्जेदार साहित्याचे मराठी भाषेत अनुवाद होण्यासाठी शासकीय मदतीने प्रयत्न होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मुळात पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाचा आग्रह सोडून मुलांना मराठी भाषेतून प्राथमिक शिक्षण देण्याची मानसिकता वाढल्यास हे संक्रमण थोपविणे शक्य आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

भाषावादामुळे बा. भ. बोरकर यांची उपेक्षा

कविवर्य बा. भ. बोरकर यांच्याविषयी काही आठवणी सांगताना, त्यांच्या निवडक कविताही श्रोत्यांसमारे गाऊन सादर केल्या. कोकणी-मराठी भाषावादामुळे बा. भ. बोरकरांना अखिल भारतीय साहित्य संमेलनापासून वंचित ठेवण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सत्तरीच्या दशकात ज्ञानपीठ पुरस्कारासाठी त्यांची शिफारस धूडकावून लावताना कोकणी कवी म्हणून निवड समितीची दिशाभूल करण्यात आली. आयुष्याच्या शेवटापर्यंत ही उपेक्षा त्यांना सलत राहिली.   बा. भ. बोरकर यांनी आपल्या कवितेतून सौंदर्यापासून अध्यात्माचा शोध घेतला.  अखेरच्या श्वासापर्यंत ते कवी म्हणून जगले. मुळात भाषा ही वादासाठी नसून साहित्यिक व्यासपीठावर असे वाद न येता साहित्य हे साहित्यामध्येच तोलले गेले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

अंत्रुज महाल ही सौंदर्य व सामर्थ्याची भूमी : डॉ. सोमनाथ कोमरपतं

डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी अंत्रुज महालातील साहित्य व कलाविश्वाचा आढावा घेतला. साहित्यिक अभिसरणात या प्रदेशाचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. येथील संस्कृती, मंदिर परंपरा व निसर्गामध्ये कला निर्मितीला उर्जा देणारी प्रेरणा आहे. सौंदर्य व सामर्थ्याची ही भूमी असल्याचे सांगून, नवीन पिढीने हा वारसा व विचार पुढे नेण्याचे आवाहन केले. रमेश वंसकर यांनी अशाप्रकारच्या साहित्य संमेलनातून नवीन साहित्यिकांच्या जडणघडणीला वाव मिळत असल्याचे सांगितले. आजचे साहित्य हा उद्याचा इतिहास होत असतो. त्यासाठी लेखकांनी जबाबदारीने लिहिले पाहिजे, असे श्याम प्रभूदेसाई म्हणाले. सागर जावडेकर यांनी स्वागत व प्रासताविक भाषणात बिल्वदलच्या साहित्यिक उपक्रमांचा आढावा घेतला. कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या बोरी गावात होणाऱ्या या साहित्य संमेलनाला विशेष महत्व असल्याचे सांगितले.

ज्येष्ठ लेखिका लक्ष्मी जोग यांच्या ‘झुंजार क्रांतीवीर’ व प्रसाद सावंत यांनी तारा राणींवर लेहिलेल्या ‘तेजस्वी तारा’ या नाट्यापुस्तकाचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन झाले. झी मराठीच्या लिटल चॅम्प स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेले बालकलाकार हृषिकेश नितिन ढवळीकर व गार्गी सिद्धये यांचा घन:श्याम बोरकर यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. नवदुर्गा गोपाळकृष्ण महिला मंडळातर्फे बा. भ. बोरकर यांच्या पुतळ्यापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. मैथिली आमशेकर हिने ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती हजारे यांनी तर करुणा बाक्रे यांनी आभार मानले. त्यानंतर विविध सत्रे झाली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article