For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रेसलिंग चॅम्पियन्स सुपर लीग’ जाहीर

06:37 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘रेसलिंग चॅम्पियन्स सुपर लीग’ जाहीर
Advertisement

साक्षी मलिक-गीता फोगटकडून घोषणा, अमन सेहरावतचाही सहभाग, कुस्ती महासंघाकडून मंजुरीस नकार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिक व अमन सेहरावत यांच्यासह जागतिक स्पर्धेतील माजी कांस्यपदकविजेती गीता फोगटने ते देशातील नवोदित कुस्तीपटूंसाठी लवकरच रेसलिंग चॅम्पियन्स सुपर लीग सुरू करणार असल्याचे सोमवारी जाहीर केले आहे. मात्र राष्ट्रीय महासंघाने या उपक्रमाला मंजुरी देण्यास नकार दिला आहे.

Advertisement

बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्यासह साक्षीने लैंगिक छळाचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंच्या निषेधाचे नेतृत्व केले होते. मात्र बजरंग व विनेश यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या हरयाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये सामील होऊन राजकीय रिंगणात उडी घेतल्यानंतर साक्षीने त्यांच्यापासून स्वत:ला काहीसे दूर ठेवले आहे.

2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 58 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकणाऱ्या साक्षीने 2012 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 55 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलेल्या फोगटसोबत त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून या उपक्रमाची घोषणा केली. या दोघांनी पॅरिस गेम्समधील कांस्यपदक विजेता अमन त्यांच्याबरोबर असल्याची घोषणा केली आहे. मात्र यासंदर्भात कोणताही तपशील दिलेला नाही. फोगटने त्यांना महासंघ आणि सरकारकडून पाठिंबा मिळण्याची आशा असल्याचे म्हटले आहे.

‘साक्षी आणि मी या लीगचे खूप दिवसांपासून नियोजन करत आहोत. लवकरच ती अंतिम रूप घेईल. आम्ही अजून भारतीय कुस्ती महासंघाशी बोललेलो नाही. पण महासंघाने आणि सरकारने आम्हाला पाठिंबा दिल्यास खूप छान होईल. ही पहिली अशी लीग असेल जी फक्त खेळाडूंद्वारे चालवली जाईल, असे फोगटने सांगितले. मात्र भारतीय कुस्ती महासंघाने स्पष्ट केले आहे की, ते या लीगला मान्यता देणार नाहीत. ‘आम्ही याला मान्यता देणार नाही. आम्ही आमच्या प्रो रेसलिंग लीगचे पुनऊज्जीवन करत आहोत आणि आम्हाला आशा आहे की, ती लवकरच प्रत्यक्षात येईल. कुस्तीपटू स्वत:ची लीग आयोजित करण्यास मोकळे आहेत. ते खेळाला प्रोत्साहन देऊ शकतात, परंतु आम्ही त्याच्याशी जोडले जाणार नाही’, असे महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.