भारतीय पुरुषांची अझरबैजानवर, तर महिलांची कझाकस्तानवर मात
वृत्तसंस्था/ बुडापेस्ट, हंगेरी
जागतिक विजेतेपदाचा आव्हानवीर डी. गुकेश आणि अर्जुन एरिगेसी या दोन फॉर्मात असलेल्या बुद्धिबळपटूंच्या पाठिंब्यावर भारतीय पुरुषांनी येथे चालू असलेल्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या पाचव्या फेरीत अझरबैजानवर 3-1 असा विजय मिळवला, तर महिलांनी कझाकस्तानवर मात केली. गुकेश आणि अर्जुन यांची ऑलिम्पियाडमध्ये अजूनपर्यंत निर्दोष वाटचाल राहिलेली असून त्यांनी अनुक्रमे आयदिन सुलेमानली आणि रौफ मामेदोव्ह यांच्यावर पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना झटपट मात केली.
प्रज्ञानंदला आणखी एका बरोबरीवर समाधान मानावे लागले असले, तरी त्याने भारताचा विजय निश्चित केला. दुसरीकडे, विदित गुजराथीने मॅरेथॉन गेममध्ये शाखरियार मामेदयारोवसोबतची लढत बरोबरीत सोडवून विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय पुऊषांचा हा पाचवा विजय असून दहा गुणांची कमाई करताना त्यांनी आपल्याला अपराजित ठेवले आहे. दुसरीकडें, व्हिएतनामने प्रभावी प्रदर्शन कायम ठेवताना पोलंडचा 2.5-1.5 असा पराभव केला.
आघाडीवरील संघांतील इतर दोन संघ चीन आणि हंगेरी असून त्यांनी अनुक्रमे स्पेन आणि युक्रेनवर 2.5-1.5 याच समान फरकाने विजय मिळवले. या सर्वांत मोठ्या बुद्धिबळ स्पर्धेत सहा फेऱ्या बाकी असताना मॅग्नस कार्लसनचा नॉर्वे आणि इराण हे दोन संघ प्रत्येकी 9 गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. नॉर्वेने तुर्की संघाचा 3-1 अशा फरकाने पराभव केला, तर इराणने कॅनडाचा 3.5-0.5 असा पराभव केला.
महिला विभागात भारताची ग्रँडमास्टर डी. हरिकाला धक्कादायक पराभव पत्करावा लागून कझाकस्तानला सुऊवातीला आघाडी मिळाली. लढतीत बहुतेक वेळ हरिका सुस्थितीत राहिली होती आणि अनेक पंडितांना बिबिसारा अस्साउबायेवाविऊद्ध ती जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे वाटले होते. पण नंतर तिने चुकीचा खेळ केला. पण वंतिका अग्रवालने अलुआ नूरमनविऊद्ध पांढऱ्या सोंगाट्यानिशी खेळताना विजय नोंदविला, तर झेनिया बालाबायेवासोबतचा सामना दिव्या देशमुखने बरोबरीत सोडविला.
गुणसंख्या 2-2 अशी बरोबरीत असताना वैशालीवर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी येऊन पडली आणि तिनेही निराश न करता मेऊर्ट कमलिडेनोव्हाचे आव्हान मोडीत काढले. टीम इंडिया सध्या आर्मेनिया आणि मंगोलियासोबत दहा गुणांनिशी आघाडीवर पोहोचली आहे. आर्मेनियाने चिनी संघाची घेडदौड रोखताना त्यांना 2.5-1.5 असे पराभूत केले, तर मंगोलियाने त्याच फरकाने अमेरिकेला नमविले. या तिन्ही संघांचे प्रत्येकी 10 गुण झाले आहेत आणि जॉर्जिया व पोलंड त्यांच्यापेक्षा अर्ध्या गुणाने मागे आहेत.