कुस्तीपटू विनेश-बजरंग यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
हरियाणात विधानसभा निवडणूक लढवण्याचीही ऑफर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दोघेही पुढील महिन्यात हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. फोगट आणि पुनिया यांनी बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. विनेश फोगट जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. या जागेवर सध्या जननायक जनता पक्षाचे अमरजित धांडा आमदार आहेत. पुनिया यांच्या जागेबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.
विनेश फोगट आणि बजरंग पुनिया या दोन्ही कुस्तीपटूंनी भाजप खासदार आणि माजी महासंघ प्रमुख ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरोधात आंदोलनाचे नेतृत्व केले होते. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आणि त्यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्या समावेशामुळे राज्यातील मतदारांमध्ये काँग्रेसची बाजू अधिक मजबूत होईल, असे काँग्रेस नेत्यांना वाटते. राज्यात 2014 पासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. फोगट यांचा हरियाणातील शेतकऱ्यांशी संबंध आहे. एमएसपीच्या कायदेशीर हमीसारख्या मुद्यांवर लाखो शेतकरी अजूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहेत. गेल्या आठवड्यात विनेश फोगट हिने हरियाणा-दिल्ली सीमेवर असलेल्या शंभू बॉर्डरवर आंदोलनस्थळी पोहोचत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते, असे त्या म्हणाल्या होत्या.