नरेश मीणांच्या अटकेनंतर तणाव
वृत्तसंस्था/जयपूर
राजस्थानात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला थप्पड लगावल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर देवली-उनियारा या भागात तणावाचे वातावरण आहे. नरेश मीणा समर्थकांनी ठिकठिकाणी वाहतूक रोखत दगडफेक केली आहे. तर हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा मारा केला आहे. तत्पूर्वी पोलिसांचे पथक समरावता गावात पोहोचले होते, त्यांनी नरेश मीणाला आत्मसमर्पण करण्याची सूचना केली होती. परंतु मीणा समर्थकांनी पोलिसांना विरोध करण्यास सुरुवात केल्याने तणाव वाढला. स्थिती चिघळत चालल्याचे पाहून पोलिसांनी नरेश मीणा यांना एका चिलखती वाहनात बसून त्वरित गावातून पडण्याचा निर्णय घेतला होता. नरेश मीणा यांनी पोलिसांकडू अटक केली जाण्यापूर्वी एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओत काँग्रेसचा पूर्वाश्रमीचे नेते असलेल्या मीणा यांनी समर्थकांना पोलिसांना घेरण्याचे आवाहन केले होते. तसेच रस्त्यांवरील वाहतूक रोखण्याचा निर्देश समर्थकांना दिला होता.
नरेश मीणा यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी थप्पड लगावली होती. यानंतर समरावता गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलीस बुधवारी रात्रीपासूनच मीणा यांना अटक करण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु आरोपी फरार झाला होता. यानंतर गुरुवारी दुपारी मीणा यांना अटक करण्यास पोलिसांना यश आले होते. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील देवली-उनियारा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान गोंधळ झाला होता. या गोंधळादरम्यान समरावता गावात अपक्ष उमेदवार मीणा यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना थप्पड लगावली होती. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. पोलिसांनी ग्रामस्थांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दगडफेक सुरू झाली होती. संतप्त लोकांनी तोडफोड तसेच जाळपोळ करत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे.