डब्ल्यूपीएल लिलाव : दीप्ती शर्मा ठरली महागडी खेळाडू
3.20 कोटीला यूपी वॉरियर्सकडे, शिखाला ‘लॉटरी’, अमेलिया केर, श्री चरणी, वोल्वार्ड यांनाही मोठी रक्कम
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताची स्टार महिला अष्टपैलू क्रिकेटपटू दीप्ती शर्माने येथे झालेल्या डब्ल्यूपीएल लिलावात बाजी मारली असून ती सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. तिला यूपी वॉरियर्सने 3.20 कोटी रक्कम देत आपल्या ताफ्यात घेतले आहे. याशिवाय विश्वचषक विजेत्या संघांतील सदस्य, श्री चरणी, लॉरा वोल्वार्ड यांनाही भरघोस रक्कम मिळाली आहे. आश्चर्य म्हणजे अॅलीसा हिली अनसोल्ड राहिली.
अनुभवी दीप्तीने अपेक्षेप्रमाणे मोठी रक्कम मिळविली असून यूपी वॉरियर्सने तिला राईट टू मॅच (आरटीएम) द्वारे तिला आपल्या संघात राखताना तब्बल 3.20 कोटी रुपये दिले. डब्ल्यूपीएल इतिहासातील सर्वाधिक रक्कम मिळविणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी स्मृती मानधनाने तिच्यापेक्षा 20 लाख जास्त मिळविले होते. ‘आम्हाला अपेक्षा होती की किंमत आमच्या अंदाजाप्रमाणे असेल. उच्च दर्जाच्या फिरकी गोलंदाजांसाठी अशी मोठी रक्कम मोजावी लागते. आम्हाला दीप्ती परत हवी होती, यात काहीच शंका नव्हती,’ असे यूपी वॉरियर्सचे क्रिकेट ऑपरेशन्स संचालक क्षेमल वायंगणकर म्हणाल्या.
वॉरियर्सला लिलावासाठी सर्वाधिक 14.5 कोटी मिळाले होते. दीप्तीप्रमाणे त्यांनी आरटीएमचा उपयोग करून युवा वेगवान गोलंदाजी क्रांती गौड (50 लाख) व इंग्लंडची स्पिनर सोफी एक्लेस्टोन (85 लाख) आणि हरलीन देओल (50 लाख बेस प्राईस) यांना आपल्या ताफ्यात घेतले. गुजरात जायंट्सने वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकुरला 60 लाखात तर आरसीबीने बिग हिटर द.आफ्रिकेची नदिन डी क्लर्कला 65 लाखात तर अष्टपैलू अरुंधती रे•ाrला 75 लाखात, राधा यादवला 65 लाखात खरेदी केले. अनुभवी मेग लॅनिंग व सोफी डिव्हाईन यांनाही बऱ्यापैकी मोठी रक्कम मिळाली. गुजरात जायंट्सने डिव्हाईनला 2 कोटीला तर यूपी वॉरियर्सने लॅनिंगला 1.90 कोटीला आपल्या संघात घेतले. तिच्यासाठी तिचा माजी संघ दिल्लीने जोरदार चुरस केली होती. वॉरियर्सने फोबे लिचफील्डला 1.20 कोटीला तर आशा शोभनाला 1.10 कोटीला, मुंबई इंडियन्सने शबनिम इस्माईलला 60 लाखाला घेतले.