अबब.. सार्वजनिक मंडळापेक्षाही खर्चिक घरगुती देखावा
सांगली / सचिन ठाणेकर :
श्री गणरायाचे आगमन लवकरच होत आहे. सांगली शहरात सर्वत्र बाप्पाच्या स्वागताची धूम सुरु आहे. अनेक घरगुती गणरायांसह सार्वजनिक मंडळात बाप्पा बुधवारी विराजमान होणार आहेत. त्यामुळे बाप्पाच्या आगमनासाठी घरोघरी व अनेक मंडळांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. सांगलीतील गुजर बोळामधील संतोष प्रभाकर सूर्यवंशी हे अवलिया आपल्या घरी प्रतिवर्षी मोठा खर्चिक देखावा करतात. याचा खर्च एखाद्या छोट्या सार्वजनिक मंडळापेक्षाही मोठा असतो.
सांगलीतील अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये हालत्या देखाव्यांची मोठी परंपरा आहे. बाप्पांची आरास व देखाव्यासाठी लोक वर्गणीतून मोठा खर्च केला जातो. पण शहरातील काही हौशी नागरिकही आपल्या घरगुती गणपतीसाठी मोठा खर्चिक देखावा उभा करतात. याचे मोल पैशात नसते, कारण हा देखावा लाडक्या बाप्पांची सेवा म्हणून करतात. यासाठी त्यांच्या कुटुंबांचे पुर्ण समर्पण असते. आपला बाप्पाच्या ११ दिवसीय पाहुणचारात उणीव नसावी, यासाठी ते तनमनधन अर्पण करतात.
गुजर बोळातील संतोष सूर्यवंशी हे कर्नाळ रोडला सिमेंट विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना इंटेरियरचाही मोठा शौक आहे. पण इंटेरियरचा उपयोग ते व्यवसाय म्हणून न करता हौस म्हणून करतात. याच छंदापाई त्यांनी २०१९ पासून आपल्या घरगुती गणरायाच्या आरासासाठीही आपली ही कला जोपासली आहे.
२०१९ च्या महापुरातही त्यांचे दुकान पाण्यात होते. त्यानंतर आलेल्या गणेशोत्सवासाठी त्यांनी घरातच मोठी आरास केली. गणराय आपल्या सांगलीकरांच्या पाठीशी सदैव आहे व तोच ही सेवा करवून घेतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे २०१९ पासून त्यांनी घरगुती भव्य आरास घडवण्यास सुरुवात केली.
घरातच प्रतिवर्षी अनेक काल्पनिक मंदिरांचे देखावे त्यांनी उभे केले आहेत. ही आरास म्हणजे प्रत्यक्ष मंदिरात गेल्याचा भासच होतो. गतवर्षी त्यांनी जयपुर बिहार कोकण अशा तीन्ही संरकृतीचे एकरुप मिश्रण करुन सुंदर मंदिर केले होते. यंदाही त्यांनी काल्पनिक सुंदर शिवमंदिर उभे केले आहे.
यासाठी काळ्या पाषाणातील भिंती, वाहणारे झरे, तलाव आदींसह सुंदर आरास केली आहे.यासाठी त्यांना संपुर्ण कुटुंबांचे सहाय्य लाभत आहे. त्यांचा बाप्पाही सुंदर आरासाइतकाच मनमोहक असतो. गेली सहा वर्षे त्यांनी प्रत्येकवर्षी विराजमान झालेले बाप्पाही अजून जपून ठेवले आहेत. मुर्तीकारांनी परिश्रमाने घडवलेली श्रीची मुर्ती ते कधीच विसर्जित करत नाहीत. कारण त्यामागील मुर्तीकाराने केलेले कष्ट वाया गेलेले त्यांना आवडत नाही. प्रतिवर्षी ही मूर्तीही हवी तशी घडवून घेतात. या सर्व हौसेसाठी ते अवाढव्य खर्च करतात. पण कलेपुढे ते पैशाचा विचार करत नाहीत.
बाप्पाच आपल्याकडून ही सेवा करवून घेतो, तोच दोन्ही हातांनी भरभरुन देतो व तोच परत फेडून घेतो, असे त्यांचे म्हणणे आहे. बाप्पाचा पैसा बाप्पाचरणी अर्पण अशी त्यांची समर्पणाची भावना आहे. यंदाही ही परंपरा त्यांनी हौसेने जोपासली आहे.
- देखावा पाहण्यासाठी भाविकांनी यावे
गणरायाच्या आशीर्वादाने महापूर टळला असून, यंदाही उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणरायाच्या कृपेने घडवलेला आमचा घरगुती देखावा पाहण्यासाठी भाविकांनी अवश्य यावे व पुढील पिढीनेही ही परंपरा जोपासावी, असे माझे सांगलीकरांना आवाहन आहे.