‘कोणी अर्भक विक्री करणार का?’
बिम्समध्ये महिलेने चौकशी केल्याने खळबळ : यापूर्वीच्या चोरी प्रकरणांचाही तपास नाहीच
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागातून यापूर्वी झालेल्या अर्भकांच्या चोरी प्रकरणांचा आजतागायत तपास लागला नाही. गुरुवारी याच विभागात एका महिलेने अर्भकांच्या विक्रीसंबंधी चौकशी केल्याने खळबळ माजली आहे. प्रसूती विभागात आलेल्या एका महिलेने ‘कोणी तरी अर्भक विक्री करणार का?’ अशी चौकशी केल्याची माहिती मिळाली असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. काही जणांनी पोलिसांकडेही तक्रार केली आहे. चौकशीअंती या महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे आढळून आले. याच सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागातून दोन अर्भकांची चोरी झाली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या प्रकरणांची नोंद झाली आहे. एकाही प्रकरणाचा छडा लागला नाही. खासगी इस्पितळातील अर्भक चोरी प्रकरणाचाही छडा लागलेला नाही. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊनही प्रसूती विभागातून अर्भक पळविणारे कोण? याचा उलगडा झाला नाही. परिस्थिती अशी असताना पुन्हा एका महिलेने अर्भकांच्या विक्रीसंबंधी केलेल्या चौकशीमुळे खळबळ माजली आहे.