मराठी भाषिकांचा उद्या महामेळावा
कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला देणार प्रत्युत्तर, महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक सरकारकडून बेळगाववर आपला हक्क दाखवण्यासाठी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये भरवले जात आहे. या अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषिकांचे महाअधिवेशन (महामेळावा) सोमवार दि. 8 रोजी होणार आहे. पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी महामेळावा यशस्वी करणारच, असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक सैनिकाने केला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र सरकारने 2004 साली सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हा निकाल प्रलंबित असतानाच कर्नाटक सरकारकडून 2006 पासून बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेतले जात आहे. त्यानंतर काही वर्षांनी हलगा येथे सुवर्ण विधानसौध निर्माण करून या ठिकाणी अधिवेशन घेतले जात आहे. कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी म. ए. समितीकडून महामेळाव्याचे आयोजन केले जाते. यापूर्वी व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले जात होते. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून पोलिसांकडून परवानगी देण्यास टोलवाटोलवी केली जात आहे. यावर्षीही मध्यवर्ती म. ए. समितीने पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाला रितसर परवानगी अर्ज महिनाभरापूर्वीच दिला आहे. त्यामध्ये शहरातील महत्त्वाच्या चार ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी कोणत्याही एका ठिकाणी महामेळावा घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली होती.
युवा समितीचे आवाहन
सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मागील काही वर्षांत बेळगाववर आपला हक्क दाखवण्यासाठी आणि त्याद्वारे तीव्रतेने कन्नड भाषा सक्ती राबविण्यासाठी हिवाळी अधिवेशन भरवण्याचा घाट घातला जात आहे. याला प्रत्युत्तर म्हणून सीमाभागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा तसूभरही कमी झालेली नाही, हे दाखवून देण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी बेळगावमध्ये महामेळावा होणार असून यावेळी सीमावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सरचिटणीस श्रीकांत कदम यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
महामेळाव्यासाठी विभागवार जागृती
महामेळावा यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीसह विभाग समित्यांची बैठक पार पडली. शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, खानापूर म. ए. समितीची बैठक घेऊन महामेळावा यशस्वी करणारच, असा निर्धार करण्यात आला. याबरोबरच शहापूर विभाग, येळ्ळूर विभाग तसेच ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये महामेळाव्यासाठी जागृती करण्यात आली. काही ठिकाणी पत्रके काढून त्यांचे वितरण करण्यात आले.