स्पेनमध्ये 3 दशकातील सर्वात भीषण पूर
95 जणांचा मृत्यू : रस्त्यांवर वाहून जाताना दिसल्या कार्स
वृत्तसंस्था/बार्सिलोना
स्पेनच्या वॅलेंसियामध्ये 8 तासांच्या कालावधीत वार्षिक सरासरीइतका पाऊस पडला आहे. या अतिवृष्टीमुळे तेथे पूर आला असून यात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे रस्त्यांना नद्याचे स्वरुप प्राप्त झाले आणि कार्स वाहून जाताना दिसल्या आहेत. रेल्वमार्ग व महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. स्पेनमध्ये ही तीन दशकांमधील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती ठरली आहे. अतिवृष्टीसोबत आलेल्या वादळामुळे मलागापासून वॅलेंसियापर्यंत दक्षिण व पूर्व स्पेनच्या मोठ्या हिस्स्यात पूरसंकट निर्माण झाले आहे. वादळ उत्तर-पूर्वच्या दिशेला सरकल्याने कॅटेलोनियाच्या हिस्स्यात रेड अलर्ट जारी केला आहे. घरांमध्ये अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली आहे. काही लोक जीव वाचविण्यासाठी स्वत:च्या कारवर चढून बसले होते.