सकाळी वटपूजन, रात्री पतीची हत्या
कुपवाड :
वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र ’जन्मोजन्मी हाच पती मिळावा’, म्हणून वडाच्या झाडाची पूजा करून सुहासिनी महिला आशीर्वाद मागतात. मात्र, याचदिवशी मध्यरात्री नवविवाहित पत्नीकडून पती झोपेत असताना डोक्यात कुऱ्हाडीचे वर्मी घाव घालून त्याची निर्घृण हत्त्या केल्याची धक्कादायक घटना कुपवाडमध्ये घडल्याने चर्चेने खळबळ माजली. केवळ 15 दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळे या घटनेने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अनिल तानाजी लोखंडे (वय 53, रा. प्रकाशनगर गली नंबर 6, अहिल्यानगर, कुपवाड) असे खून झालेल्याचे नाव आहे. कौटुंबिक वादातून तसेच शाररिक संबंधाच्या कारणावरून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास घडली असून याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी संशयित पत्नी राधिका अनिल लोखंडे (वय 27) या नवविवाहितेस अटक केली आहे. तिला बुधवारी न्यायालयासमोर उभे केले असता 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, मयत अनिल लोखंडे यांचा दुसरा विवाह संशयित राधिकासोबत 23 मे 2025 रोजी माधवनगर येथील एका मंदिरात झाला होता. अनिल लोखंडे गवंडी काम करत होते. त्याची पहिली पत्नी वैशाली यांचे दोन वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते. त्यांना काजल व शिवानी या मुली असून त्यांचा विवाह झाल्याने दोघीही सासरी राहतात. अनिल लोखंडे घरी एकटेच राहत असल्याने नातेवाईकांनी त्यांचा दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नातेवाईकांनी वडी (ता. खटाव जि. सातारा) येथील बाळकृष्ण इंगळे यांची मुलगी राधिका सोबत अनिल यांचा विवाह केला.
विवाह झाल्यापासून पती-पत्नीत वारंवार शारिरीक संबंधावरुन तसेच कौटुंबिक वादावरून खटके उडत होते. मंगळवारी 10 जून रोजी वटपौर्णिमेचा सण असल्याने राधिकाला अनिल लोखंडे यांनी तिचा मावसभाऊ गणेश यांच्या घरी सोडले होते. सण संपल्यानंतर त्याचदिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास अनिल पत्नी राधिकाला घेऊन जाण्यासाठी आले. दोघेही रात्री साडेदहा वाजता अहिल्यानगर येथे त्यांच्या राहत्या घरी गेले.
रात्री साडेबाराच्या सुमारास मित्र गणेश यांनी फिर्यादी मुकेश लोखंडे यांना फोन करून राधिकाचा फोन आल्याचे कळवले होते. यावेळी राधिकाने बोलताना मावशी गेल्यापासून भीती वाटत होती. पती शरीरसंबंध ठेवण्यास बोलत असल्याचे सांगितले. यास माझी इच्छा नसल्याने शरीरसंबंध ठेवण्यापासून काल त्यांना अडविले. आजही ते शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडतील, असा विचार सतत मनात येत होता. त्याची भीती वाटू लागली.
त्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. त्यामुळे राधिका रागात होती. पती अनिल झोपण्यासाठी गेले. त्यावेळी राधिका पाणी पिण्याच्या निमित्ताने किचनमध्ये गेली. येताना हातात कुऱ्हाड घेऊन आली. अनिल झोपेत असताना राधिकाने रागाच्या भरात अनिलच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला.
घटनेची माहिती मिळताच माधवनगर येथील नातेवाईकांनी अनिल लोखंडे यांच्या घरी धाव घेतली. त्यावेळी अनिल लोखंडे रक्ताच्या थारोळ्यात अंथरूणावर पडले होते. शेजारी रक्ताने माखलेली कुऱ्हाड दिसली. याबाबत फिर्यादी मुकेश लोखंडे यांनी तातडीने कुपवाड पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी मिरजेचे उपाधिक्षक प्रणिल गिल्डा, सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी भेट देऊन पाहणी केली, पंचनामा केला. पोलिसांनी संशयित राधिकाला ताब्यात घेतले. चौकशीत राधिकाने कारण स्पष्ट करून पोलिसांना खुनाची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी राधिकाला अटक केली. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.