Satara News : बोरगावजवळ खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात; तीन जण किरकोळ जखमी, महामार्गावर वाहतूक कोंडी
सातारा बोरगाव बस अपघात ; तीन जखमी
सातारा : सातारा तालुक्यातील बोरगाव नजीक पहाटेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला. या अपघातात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वऱ्हाडी ट्रॅव्हल्स (क्रमांक: डी.डी ०१ डब्लू ९५९८) ही ट्रॅव्हल्स अपघातग्रस्त झाल्याने सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूला करण्यात आली.अपघातामुळे शेंद्रे ते नागठाणे महामार्गावर सुमारे सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
परिणामी प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक संथगतीने सुरू होती. अपघातस्थळी रस्त्यावर ट्रॅव्हल्सच्या काचांचा खच पडलेला दिसून येत होता.या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या प्रयत्नानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली..