कोरोनाची काळजी, हकालपट्टीची कारवाई
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीमुळे दक्षता घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले असून आरोग्य यंत्रणेलाही उपयुक्त सुचना करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या हायकमांडने अखेर आमदार एस. टी. सोमशेखर व शिवराम हेब्बार यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्यांची संख्या तीन झाली आहे.
कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आठवडाभरात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, मात्र सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने खबरदारी बाळगण्याचे आवाहन सरकारने केले आहे. थंडी, ताप, खोकल्याची ज्यांना लक्षणे आहेत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावेत. आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी मात्र खबरदारी म्हणून मास्कचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी केले आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोनाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे. यासाठी आवश्यक औषधे, ऑक्सीजन बेड व व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित सर्व इस्पितळात तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वानुभव लक्षात घेऊन कोरोनाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सध्या तरी परिस्थिती आटोक्यात आहे. ज्यांना थंडी, ताप, खोकला आहे, अशा मुलांना पालकांनी शाळेला पाठवू नये, असे आवाहनही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी पालकांना केले आहे. जर विद्यार्थी शाळेत असताना अशी लक्षणे दिसून आल्यास शिक्षकांनी त्या मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना घरी पाठविण्याची सूचनाही केली आहे.
पावसाची हजेरी, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आदींबरोबरच कर्नाटकात राजकीय घडामोडींनाही गती आली आहे. गेल्या आठवड्यात गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या शिक्षण संस्थांवर ईडीने छापा टाकला होता. काँग्रेस नेत्यांना लक्ष्य बनविण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप कर्नाटकात पुन्हा केला जात आहे. दुसरीकडे भाजपने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत आमदार एस. टी. सोमशेखर व शिवराम हेब्बार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दोन महिन्यात तीन आमदारांवर कारवाई झाली आहे. विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केल्याच्या कारवाई पाठोपाठ ही दुसरी कारवाई झाली आहे. विधानसभेतील भाजपचे संख्याबळ 62 वर पोहोचले आहे. या कारवाईने खऱ्या अर्थाने पक्षाची आणि या दोन्ही आमदारांची एकप्रकारे सुटकाच झाली आहे. भाजपच्या उमेदवारीवरून विजयी होऊनही ते काँग्रेसचे गोडवे गात होते. यामुळे साहजिकच पक्षाची व पक्षनेत्यांची कोंडी होत होती. या दोन्ही आमदारांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न झाले. या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर त्यांच्यावर कारवाई करणे भाग पडले.
भाजपने आमची हकालपट्टी केली आहे, याचा आम्हाला आनंद झाला आहे, अशा शब्दात दोन्ही आमदारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून त्यांची हकालपट्टी झाली असली तरी त्यांचे आमदारपद कायम राहणार आहे. पक्षाने हाकलल्यामुळे विधानसभेत आता त्यांना स्वतंत्र जागा मिळणार आहे. भाजप नेते ‘आपली कामे होईपर्यंत गुलाब जामून खायला देतात, त्यानंतर विष पाजतात’ अशा शब्दात एस. टी. सोमशेखर यांनी भाजपवर टीका करीत भाजप बरोबरचे आपले ऋणानुबंध इथेच संपले आहेत, आता आपण मुक्त आहोत. कोणत्याही कार्यक्रमात, कोणत्याही व्यासपीठावर भाग घेऊ शकतो, असे म्हटले आहे. सोमशेखर यांनी तर उघडपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. पे. शिवकुमार व कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे गुणगान सुरू केले होते. गेल्या वर्षीच्या बेळगाव अधिवेशनात विधीमंडळातही या आमदारांनी तटस्थपणा दाखविला होता. काँग्रेस संसदीय पक्ष बैठकीनंतर झालेल्या जेवणावळीत सोमशेखर दिसून आले होते.
हकालपट्टीच्या या कारवाईने दोन्ही आमदार मुक्त झाले असल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यताच अधिक आहे. काँग्रेसला रामराम ठोकून बी. एस. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी ते भाजपमध्ये आले होते. हे दोघे मंत्रीही झाले. गेल्या निवडणुकीनंतर कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेस नेत्यांबरोबर त्यांचे सख्यही वाढले. भाजप नेतृत्वाला त्यांचे हे सख्य खटकत होते. भाजपची कोंडी करण्याची एकही संधी या नेत्यांनी सोडली नाही. भाजपमध्ये राहूनच काँग्रेस सरकार बरोबरची जवळीक वाढविली. जर आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस प्रवेश केल्यानंतर पोटनिवडणूक लढवावी लागणार होती. पोटनिवडणूक जिंकल्यानंतरही मंत्रीपद मिळणार याची खात्री नव्हती. त्यामुळेच पक्षातून बाहेर पडण्यापेक्षा पक्षात राहूनच काँग्रेसशी जवळीक वाढविण्याचा निर्णय या नेत्यांनी घेतला. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर सतत टीकेची झोड उठविणारे बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यावरील कारवाईनंतर सोमशेखर व शिवराम हेब्बार यांच्यावरही कारवाई होणार याचे संकेत मिळत होते.
या दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना सुधारण्याची संधी देण्याकडे हायकमांडचा कल होता. या नेत्यांना संधी नको होती, आपल्यावर लवकरात लवकर कारवाई कशी होईल? याचीच त्यांना प्रतीक्षा होती. या कारवाईने भाजपच्या बंधनातून हे दोघे मुक्त झाले आहेत. आमचा राजकीय निर्णय काय असणार आहे? हे लवकरच जाहीर करू, असे शिवराम हेब्बार यांनी सांगितले आहे. उघडपणे सरकारचे गोडवे गाऊनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई का केली जात नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. शेवटी हायकमांडने त्या दोन्ही नेत्यांवर कारवाई केली आहे. भाजप हायकमांडने केलेली ही कारवाई व काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्षाला धार चढली आहे. शिवकुमार हे पाटबंधारे खात्याचे मंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी पाटबंधारे खात्यातील पाच अभियंत्यांची परस्पर बदली केली आहे. या बदली प्रक्रियेनंतर डी. के. शिवकुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून पाटबंधारे विभागात बदल्या करताना आपल्याला पूर्वकल्पना न देता प्रक्रिया करू नये, अशी सूचना केली आहे. अभियंत्यांच्या बदल्यांवरून सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बी. के. हरीप्रसाद यांच्या भेटीला गेले होते. हरीप्रसाद हे कर्नाटकातील विधानपरिषदेचे सदस्य असले तरी हायकमांडमधील अनेक नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. आजवर मुख्यमंत्र्यांविरुद्ध थेट टीका करणाऱ्या हरीप्रसाद यांच्या भेटीला मुख्यमंत्री दाखल झाले याचाच अर्थ राजकीय घडामोडींना गती येणार असा होतो. सत्तावाटप टाळण्यासाठी मुख्यमंत्री मंत्रीमंडळ पुनर्रचना करणार अशी चर्चाही सुरू झाली आहे. यासाठीच जूनच्या पहिल्या आठवड्यात ते दिल्लीला जाणार आहेत.