'अरिहंत'मध्ये गर्भवती महिलेवर जगातील पहिली ट्रीपल बायपास सर्जरी
बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटल अनेक मोलाचे दगड पार करत असून मोठ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे करण्यात येत आहेत. नुकताच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक जानेवारी रोजी 7 महिन्याच्या गरोदर महिलेवर यशस्वी व जटिल बायपास शस्त्रक्रिया (ट्रीपल बायपास सर्जरी) करण्यात आली. विशेष म्हणजे महिला व अर्भक सुखरूप असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. गरोदर महिलेवर ट्रिपल बायपास सर्जरी होणे ही बाब भारतातील नव्हे तर जगातील पहिली शस्त्रक्रिया आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे भारतात अशी शस्त्रक्रिया करणारे अरिहंत हॉस्पिटल पहिले असून हॉस्पिटलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अनिता (वय 37) असे शस्त्रक्रिया झालेला महिलेचे नाव आहे.
अनिता या 7 महिन्याच्या गरोदर होत्या. त्यावेळी त्यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांच्या सर्व तपासण्या केल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. यानंतर कुटुंबीयानी डॉ. एम. डी. दीक्षित यांच्याशी संपर्क साधून अरिहंत हॉस्पिटलला भेट दिली. यानंतर डॉ. एम. डी. दीक्षित यांनी अनिताच्या सर्व तपासण्यात पडताळून पाहिल्या. यात अनिता कॅल्सिफाईड ट्रिपल वेसल डिसिज विथ लेफ्टमन अर्टरी (टीव्हीडी) ने ग्रस्त होती. तिला 700 एमजी/डीएल पेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल पातळीसह हायपरकोलेस्टेरोलेमिया देखील होता. यामुळे मुख्य महाधमनी कोलेस्टेरॉलच्या साठ्यांनी घट्ट झाली होती. त्याचबरोबर तिच्यावर अँजिओप्लास्टीही करणे धोक्याचे होते. कारण यामध्ये रेडिएशन असल्यामुळे अर्भकावर विपरित परिणाम झाला असता. यानंतर डॉ. एम. डी. दीक्षित यांनी अनितावर सर्जरी करण्याचा सल्ला दिला. ही एक दुर्मिळ व अवघड शस्त्रक्रिया असल्याचेही त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी काळजावर दगड ठेवून शस्त्रक्रिया करण्याला होकार दिला.
त्यानंतर कुटुंबीयांनी 31 डिसेंबर रोजी अनिताला हॉस्पिटलमध्ये भर्ती केले. यानंतर डॉ. एम. डी. दीक्षित यांनी स्त्री रोगतज्ज्ञ सौभाग्या भट यांच्याशी शस्त्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान अनिताच्या परिस्थितीचे नाजूक स्वरूप लक्षात घेऊन सर्जिकल टीमने सखोल चर्चा केली. सर्व संभाव्य पर्यायांचा विचार केला करून लीमा-रिमा ' वाय' या तंत्राचा वापर करून 1 जानेवारी रोजी अनिताला तीन ग्राफ्ट (बायपास) करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर अनिता व अर्भकावर तसूभरही परिणाम होऊ नये, याची याथोचित काळजी हॉस्पिटलच्यावतीने घेण्यात आली. तीन-चार दिवस अनिताला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर अनितानेही योग्य प्रतिसाद दिलाने दोघांवरही कोणताही परिणाम झाला नाही. यानंतर दोघांची प्रकृती स्थिर असल्याने 8 जानेवारीला जानेवारी अनिताला डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अमृत नेर्लीकर, डॉ. अभिषेक जोशी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. निखिल दीक्षित, डॉ. अविनाश लोंढे आदींनी अनितावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. हॉस्पिटलचे चेअरमन सहकाररत्न रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी डॉक्टरांच्या पथकाचे कौतुक केले.
यावेळी डॉ. एम. डी. दीक्षित म्हणाले, 7 महिन्यांची गर्भवती महिलेवर हृदय शस्त्रक्रिया करणे खूप धोकादायक होते. आई व न जन्मलेले बाळ या दोघांचे आरोग्य संतुलित ठेवण्याच्या जटिलतेमुळे अनेक आव्हाने आमच्यासमोर उभी होती. यापैकी एक म्हणजे गर्भाला संभाव्य धोका होय. शस्त्रक्रियेसाठी गर्भवती महिलेला योग्य भूल देणे, प्रतिजैविक, वेदनाशामक औषधांसह तपासण्या मर्यादित ठेवण्यात आल्या. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही अनिता व अर्भकाची योग्य काळजी घेऊन व गर्भवती महिलेला जास्त काळ एकाच स्थितीवर ठेवता येत नसल्याने अत्यंत कमी कालावधीत अनितावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. ही एक अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया असून आमच्या हॉस्पिटलने ही यशस्वी केल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले.
गरोदर असताना ट्रीपल बायपास सर्जरी करणे ही बाब अत्यंत धोकादायक व गंभीर असते. जगात अशाप्रकारची अद्याप कोणतेही शस्त्रक्रिया झालेले नाही. गरोदर असताना महिलेला एक इंजेक्शन असो किंवा एक्स-रे असो हे करणे अत्यंत धोकादायक असते. पण अरिहंत हॉस्पिटलने धोका पत्करून डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली दोघांचेही योग्य ते काळजी घेऊन यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे अरिहंत हॉस्पिटलसह शस्त्रक्रियेसाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे.