For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकन ‘एनएसएं’च्या दौऱ्याकडे जगाचे लक्ष

06:59 AM Jan 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकन ‘एनएसएं’च्या दौऱ्याकडे जगाचे लक्ष
Advertisement

दोन दिवशीय भारत दौऱ्यात चीन, बांगलादेशसंबंधीही चर्चा होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जॅक सुलिव्हन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून त्यांच्या या भेटीकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. जॅक सुलिव्हन भारतीय समकक्ष अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि इतर उच्च अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याची ही शेवटची भारत भेट आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष म्हणून अलिकडेच निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी केवळ पंधरा दिवस अगोदर हा दौरा होत आहे.

Advertisement

अमेरिकन एनएसएच्या भारत भेटीदरम्यान द्विपक्षीय वाटाघाटींसोबतच चीनमधील धरण आणि बांगलादेशातील तणावाच्या मुद्यांवरही चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. जॅक सुलिव्हन यांच्या भेटीचा मुख्य उद्देश भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करणे हा असल्याचे व्हाईट हाऊस प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या दौऱ्यादरम्यान, इंडो-पॅसिफिक आणि त्यापलीकडे अंतराळ, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य यासारख्या सामायिक सुरक्षा प्राधान्यांवर तपशीलवार चर्चा होईल. त्याव्यतिरिक्त चिनी धरणांच्या प्रभावावर चर्चा होणेही अपेक्षित आहे.

सुलिव्हन यांचा हा भारत दौरा दोन दिवसांचा आहे. चीनचा ब्रम्हपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याचा प्रकल्प आणि त्यामुळे भारताला असलेला धोका, तसे बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार हे त्यांच्या दौऱ्याचे विषय भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मानले जात आहे. चीनने सीमावर्ती नद्यांच्या वरच्या भागांमध्ये धरणे बांधण्याचा सपाटा लावला आहे. ही धरणे पर्यावरणासाठी घातक आहेतच. तसेच ती खालच्या भागांमध्ये असणाऱ्या देशांसाठीही अत्यंत धोकादायक आहेत. अमेरिकेला याची जाणीव आहे. त्यामुळे सुलिव्हन यांच्या भारत दौऱ्यात या संबंधात निश्चितपणे चर्चा होईल, असे प्रतिपादन अमेरिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने केले. अमेरिकेत 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी होणार आहे. त्याआधीचा हा कोणत्याही उच्चपदस्थ अमेरिकन अधिकाऱ्याचा विद्यमान जोसेफ बायडेन सरकारच्या काळातील शेवटचा भारत दौरा ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.