तिसरे महायुद्ध अन् घुसखोरी टाळणार
शपथविधीपूर्व भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आपण अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणार असून तिसरे महायुद्ध, तसेच अमेरिकेत होणारी बेकायदा घुसखोरी टाळणार आहोत, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे पोहचल्यानंतर शपथविधी कार्यक्रम होण्याच्या आधी त्यांनी केलेल्या भाषणात या घोषणा करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी मावळते अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनीही राष्ट्राला उद्देशून संदेश दिला. अमेरिकेचे प्रशासन आणि अमेरिकेची सेना यांना कट्टर डाव्या विचारसरणीपासून मुक्त केले जाईल, अशीही महत्वाची घोषणा ट्रंप यांनी केली. ही घोषणा आता चर्चेचा विषय बनली आहे.
वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटॉल वन या भागात रविवारी रात्री ट्रम्प यांची विजयसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला रिपब्लिकन पक्षाचे अनेक मान्यवर नेते आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मी अध्यक्ष बनल्यानंतर अमेरिकेच्या नागरिकांना सर्वोत्तम प्रथम दिवस, उत्कृष्ट प्रथम सप्ताह आणि असामान्य प्रथम 100 दिवस देणार आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या अध्यक्षीय इतिहासात, एवढ्या कमी कालावधीत जे घडले नाही, ते मी करुन दाखविणार आहे, अशी घोषणा ट्रम्प यांनी विजय सभेत केलेल्या भाषणात केली आहे.
सर्व घुसखोरी थांबविणार
उद्याचा सूर्य मावळेपर्यंत अमेरिकेत होणारी सर्व घुसखोरी थांबलेली असेल, असे आश्वासन त्यांनी दिले. अमेरिकेच्या सीमारेषेवरील सुरक्षा भक्कम करण्यात येईल. सीमा ओलांडून अमेरिकेत बेकायदा प्रवेश करण्यासाठी उपयोगात आणले जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येतील. मावळत्या अध्यक्षांनी घेतलेले अनेक निर्णय पहिल्या काही दिवसांमध्येच रद्द करण्यात येतील. आम्ही आमची संपत्ती परत मिळवणार आहोत. अमेरिकेच्या भूगर्भात असणारे ‘द्रवरुप सोने’ आम्ही उपयोगात आणणार आहोत, अशी विधाने त्यांनी केली. द्रवरुप सोने याचा अर्थ अमेरिकेची खनिज संपत्ती आणि पेट्रोलियम असा आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
घुसखोरांना परत पाठविणार
अमेरिकेत बेकायदा शिरलेल्या घुसखोरांना परत पाठविण्यासाठी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे अभियान आपण हाती घेणार आहोत. सत्तेवर आल्यानंतर त्वरित अमेरिकेच्या सीमारेषांवरील देखरेख वाढविली जाणार आहे. अमेरिकेची कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडविणाऱ्या प्रत्येक घुसखोर गुन्हेगाराला आणि अशा टोळ्यांना अमेरिकेबाहेर काढण्यात येणार आहे. उघड्या सीमा, उघडी कारागृहे, महिलांमधून खेळ खेळणारे पुरुष इत्यादी अनैतिक प्रकार बंद केले जातील, अशा अनेक घोषणा ट्रम्प यांनी या मेक अमेरिका ग्रेट अगेन या विजय सभेत केल्या आहेत.
100 आदेश काढणार
अमेरिकेचे अध्यक्ष ना नात्याने आपल्या प्रथम कार्यदिनी डोनाल्ड ट्रम्प 100 प्रशासकीय आदेश लागू करणार आहेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या आदेशांमुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात परिवर्तन होईल, असे अनुमान आहे. एच 1 बी व्हिसासंबंधी त्यांची काय भूमिका असणार, याकडे भारताचे विशेषत्वाने लक्ष असेल. तसेच भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांची दृढता, दिशा आणि भवितव्यही ट्रम्प यांच्या धोरणांवर ठरणार आहे. त्यामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात ट्रम्प यांच्या या चार वर्षांच्या कार्यकाळाविषयी उत्सुकता आणि कुतुहल आहे.
गाझातील शांततेचे श्रेय
आपण सत्तेवर येण्यापूर्वीच इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी करार झाला आहे. हा करार होण्यात आपण पुढाकार घेतला होता. जगात युद्ध होऊ नये असे आपले ध्येय असून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मध्य-पूर्वेत स्थायी शांततेसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अमेरिकेत टिक-टॉक पुन्हा सुरु
ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर चीनचे टिकटॉक हे अॅप बंद होणार, अशी शक्यता होती. त्यामुळे शनिवारपासूनच अमेरिकेतल्या स्टोअर्समधून हे अॅप गायब झाले होते. मात्र, ते बंद केले जाणार नाही. अमेरिका त्यात 50 टक्के भागीदारी घेईल अशी घोषणा ट्रम्प यांनी भाषणात केल्याने पुन्हा या अॅपची विक्री अमेरिकेत सुरु झाली आहे. अमेरिकन कंपन्या या चीनी कंपनीमध्ये 50 टक्के भागीदारी घेणार आहेत.