डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
‘कॅपिटॉल’मध्ये शानदार सोहळ्यात शपथविधी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटॉल हिल परिसरातील संसदेच्या वास्तूत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे शपथग्रहण केले आहे. ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्टस् यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ट्रम्प यांनी बायबलच्या दोन ग्रंथांवर हात ठेवून शपथग्रहण केले. यापैकी एक ग्रंथ पारंपरिक होता, तर दुसरा ट्रम्प यांच्या आजीने त्यांना भेट दिलेला होता, अशी माहिती देण्यात आली आहे.
ट्रम्प यांच्याआधी त्यांचे सहकारी उप राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांचे शपथग्रहण झाले. या कार्यक्रमाला जगभरातील विविध राष्ट्रांचे प्रमुख आणि उच्चस्तरीय प्रतिनिधी उपस्थित होते. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीसाठी इतर देशांमधील प्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारत सरकारच्या वतीने परराष्ट्र व्यवहारमंत्री सुब्रम्हण्यम जयशंकर उपस्थित होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जोसेफ बायडेनही या कार्यक्रमाला होते. मात्र, अध्यक्षीय निवडणुकीतील ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांनी या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याने तो चर्चेचा विषय होता. अमेरिकेच्या दोन्ही लोकप्रतिनिधी सभागृहांचे प्रमुख आणि सदस्य उपस्थित होते. तसेच इटलीच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी, अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर गेराल्डो मिलेई, चीनचे उपाध्यक्ष हॅन झेंग, जपानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री ताकेशी इवाया आणि अनेक देशांचे मान्यवर उच्चाधिकारी उपस्थित होते. तसेच इतर क्षेत्रांमधील मान्यवर व्यक्तिमत्वेही होती.
भारतातील विशेष उपस्थित
भारतातून प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी सपत्नीक उपस्थित होते. रविवारी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि शपथविधीपूर्व रात्रीच्या जेवणाला उपस्थित राहिले. डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांचे मनापासून स्वागत केले. त्याव्यतिरिक्त ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून भारतातील कल्पेश मेहता आणि पंकज बन्सल हे देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. कल्पेश मेहता डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीच्या कंपनीसाठी भारतात ट्रम्प टॉवर्स बांधतात. तर पंकज हे ‘एम3एम इंडिया’चे संचालक आहेत.
सहस्रावधी कार्यकर्त्यांचा जल्लोष
शपथविधीचा कार्यक्रम जरी बंदिस्त सभागृहात झाला असला, तरी सभागृहाबाहेर कॅपिटॉल हिल परिसरात रिपब्लिकन पक्षाचे सहस्रावधी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी शपथग्रहण झाल्यानंतर एकच जल्लोष केला. पक्षाच्या आणि ट्रम्प यांच्या विजयाच्या घोषणांनी, तसेच ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेने वातावरण भारुन गेले होते. ट्रंप यांना शुभेच्छा, अशा घोषणाही दिल्या जात होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी विषेश व्यक्तीगत पत्र, शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित असणारे भारताचे प्रतिनिधी एस. जयशंकर यांच्याकरवी पाठविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या पत्राचा आशय काय आहे, यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हे पत्र जयशंकर ट्रंप यांच्यापर्यंत पोहचविणार आहेत, असे काही सूत्रांनी