विश्व टेनिस लीग स्पर्धा बेंगळूरात डिसेंबरमध्ये
वृत्तसंस्था / बेंगळूर
विश्व टेनिस लीग स्पर्धा बेंगळूरमध्ये 17 ते 20 डिसेंबर दरम्यान भरविली जाणार आहे. या स्पर्धेत रशियाचा अव्वल टेनिसपटू डॅनियल मेदव्हेदेव आणि भारताचा रोहन बोपन्ना यांचा एकाच संघात समावेश आहे.
या स्पर्धेचा ड्रॉ नुकताच काढण्यात आला. ही स्पर्धा फ्रांचायझींच्या सहभागांनी आयपीएल स्पर्धेप्रमाणे होणार आहे. या स्पर्धेत चार विविध फ्रांचायझींचे चार संघांचा समावेश राहील. 2025 च्या विश्व टेनिस लीग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चार संघांमध्ये एकूण 16 आंतरराष्ट्रीय आणि भारतीय टेनिसपटूंचा समावेश राहील. सदर स्पर्धा बेंगळूरातील एस. एम. कृष्णा टेनिस स्टेडियममध्ये भरविली जाणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा होत आहे. यापूर्वी विश्व टेनिस लीगच्या पहिल्या तीन स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये यशस्वीपणे भरविण्यात आल्या होत्या. आता पहिल्यांदाच ही स्पर्धा युएई बाहेर होत आहे.
या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा निक किरगॉईस, कॅनडाचा डेनिस शेपोव्हॅलोव्ह, इलिना स्वीटोलिना, गेल मोनफिल्स, पावोला बेडोसा, मॅगेडा लिनेटी या विदेशी टेनिसपटूंचा सहभाग राहील. रोहन बोपन्ना, शेहजा यमलापल्ली, युकी भांब्री, माया रेवती, दक्षिणेश्वर सुरेश, अंकिता रैना, सुमित नागल, श्रीवल्ली भामिदीपती या भारतीय टेनिसपटूंचाही या स्पर्धेत समावेश असणार आहे.
गेम चेंजर फाल्कन्स- डॅनिल मेदव्हेदेव, रोहन बोपन्ना, मॅगेडा लिनेटी, शेहजा यमलापल्ली,
व्ही.बी.रियालिटी हॉक्स: डेनिस शेपोव्हॅलोव्ह, युकी भांब्री, इलिना स्वीटोलिना, माया रेवती,
ऑसी मॅव्हेरिक्स काईट्स- निक किरगॉइस, दक्षिणेश्वर सुरेश, मार्टा, कोस्ट्यूक, अंकिता रैना
एओएस इगल्स- गेल मोनफिल्स, सुमित नागल, पावोला बेडोसा आणि श्रीवल्ली भामिदीपती