For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाचा 101 नंबरी विजय

12:02 PM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाचा 101 नंबरी विजय
Advertisement

द.आफ्रिकेवर 101 धावांनी मात :  सामनावीर हार्दिक पंड्याचे आक्रमक अर्धशतक तर बुमराह, वरुण, अक्षर पटेल, अर्शदीपचे प्रत्येकी 2 बळी : मालिकेत 1-0 ने आघाडी

Advertisement

वृत्तसंस्था/कटक

भारताने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला तब्बल 101 धावांनी धूळ चारली. कटकमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 175 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 74 धावांवर गारद झाला. यापूर्वी कटकच्या बाराबती स्टेडियमवर भारत कधीच आफ्रिकेला हरवू शकला नव्हता. येथे झालेल्या दोन्ही सामन्यांत आफ्रिकेनेच भारताला नमवले होते मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा दुष्काळ संपवत आफ्रिकेला 101 धावांच्या पराभवाचा चटका दिला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 11 डिसेंबर रोजी चंदीगड येथे होईल.

Advertisement

प्रारंभी, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 176 धावांचे आव्हान ठेवले होते. कटकच्या दव पडलेल्या खेळपट्टीवर आफ्रिकन संघासाठी हे कठीण आव्हान होते. पहिल्याच षटकांत डिकॉकला अर्शदीपने भोपळाही फोडू दिला नाही.  यानंतर मार्करम आणि ट्रिस्टन स्टब्ज 14 धावा करुन माघारी परतले. डेवॉल्ड ब्रेविसने सर्वाधिक 22 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज मात्र भारतीय गोलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरले. डेव्हिड मिलर, जॅन्सेन यांनीही निराशा केली यामुळे आफ्रिकन संघ 12.3 षटकांत 74 धावांत ऑलआऊट झाला. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहृ, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

टीम इंडियाचा विजयारंभ

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. मात्र भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. गिल तिसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्याला लुंगी एनगिडीने 4 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला होता. त्याने सुरुवात चांगली केली. तिसऱ्या षटकात चौकार आणि षटकार मारला. पण त्यानंतर चौथ्या चेंडूवर एनगिडीनेच एडेन मार्करमच्या हातून त्याला झेलबाद केले. सूर्याने 11 चेंडूत 12 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मासह तिलक वर्माने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण अभिषेकचा मोठा अडथळाही सिपामलाने दूर केला. त्याला 12 धावा करता आल्या. यामुळे भारताची अवस्था 48 धावांवर 3 विकेट्स अशी झाली.

हार्दिकचे दमदार कमबॅक

तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी 30 धावांची भागीदारी करत संघाला 70 धावांचा टप्पा पार करून दिला. पण तिलकही 12 व्या षटकात बाद झाला.  तिलकने 26 धावांचे योगदान दिले. त्याच्यानंतर हार्दिक पंड्याने फलंदाजीला येताच आक्रमक शॉट्स खेळत इरादा स्पष्ट केला. कमबॅक करताना त्याने आफ्रिकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे यावेळी पहायला मिळाले. हार्दिकने 20 व्या षटकात षटकारासह 25 चेंडूत अर्धशतकही पूर्ण केले. यासोबतच त्याचे टी -20 कारकिर्दीत 100 षटकारही पूर्ण झाले. एकीकडे विकेट्स जात असताना हार्दिकने आक्रमक फलंदाजीसह संघाला 20 षटकात 6 बाद 175 धावांपर्यंत मजल मारुन दिली. हार्दिक 28 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 59 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या बाजूने अक्षर पटेल, शिवम दुबे या स्टार फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. लुथो सिपामलाने 2 तर डेनोवन फरेराने 1 विकेट घेतली.

जसप्रीत बुमराहचा आणखी एक विक्रमी कारनामा

द.आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात बुमराहने 2 बळी घेतले. या दोन बळीसह त्याने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 विकेट्स घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. बुमराहने डेवाल्ड ब्रेविसला बाद करत टी-20 क्रिकेटमधील 100 वी विकेट मिळवली. बुमराहने कसोटीत 234 विकेट्स, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 149 तर टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 101 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच बुमराह आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 विकेट्स घेणारा जगातील पाचवा गोलंदाज ठरला. याआधी लसिथ मलिंगा, टीम साऊदी, शाहीन शाह आफ्रिदी व शाकिब अल हसन यांनी अशी कामगिरी केली आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत 20 षटकांत 6 बाद 175 (अभिषेक शर्मा 17, शुभमन गिल 4, सूर्यकुमार यादव 12, तिलक वर्मा 26, अक्षर पटेल 23, हार्दिक पंड्या 28 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारासह नाबाद 59, शिवम दुबे 11, जितेश शर्मा नाबाद 10, एन्गिडी 3 बळी, सिपामला 2 बळी). दक्षिण आफ्रिका 12.3 षटकांत सर्वबाद 74 (डिकॉक 0, मार्करम 14, ट्रिस्टन स्टब्ज 14, डेव्हिड मिलर 1, फरेरा 5, डेवाल्ड ब्रेविस 22, जॅन्सेन 12, केशव महाराज 0, नोर्तजे 1, सिपामला 2, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराहृ, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल प्रत्येकी 2 बळी).

Advertisement
Tags :

.