For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

World Tailoring Day 2025: लंडनचा डिप्लोमा, मिरजेतील राजपरिवाराचे शाही कपडे शिवणारे 'राजाचे टेलर' कोण?

01:52 PM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
world tailoring day 2025  लंडनचा डिप्लोमा  मिरजेतील राजपरिवाराचे शाही कपडे शिवणारे  राजाचे टेलर  कोण
Advertisement

मिरज संस्थान हे दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संस्थान होते

Advertisement

By : मानसिंगराव कुमठेकर

सांगली : व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यासाठी आकर्षक रूबाबदार शरीरयष्टीबरोबरच सुंदर कपड्यांचीही आवश्यकता असते. हे कपडे शिवणारे विशिष्ट टेलरही महत्वाचे असतात. एकदाका ग्राहकांचा विश्वास टेलरवर बसला की वर्षांनुवर्षे अनेक पिढ्या एकाच टेलरकडे कपडे शिवून घेतात. मिरज संस्थांनच्या राजाचेही असेच विशिष्ट टेलर होते. धोंडी कृष्णा गायकवाड हे त्यांचे नाव.

Advertisement

लंडन डिप्लोमा केलेले धोंडीराम गायकवाड यांनी तब्बल तीन पिढ्या मिरज संस्थांच्या राजा आणि राजपरिवाराच्या विविध प्रकारच्या कपड्यांची शिलाई केली. त्यामुळे ते 'राजाचे टेलर' म्हणूनच प्रसिद्ध होते. मिरज संस्थान हे दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संस्थान होते. पटवर्धन संस्थानिकांची ही राजधानी होती. या संस्थानिकांना मोठा मान होता.

या संस्थानिकांचे कपडे शिवून देण्याचे काम विशिष्ट शिंपी करून देत असत. यापैकी धोंडी कृष्णा गायकवाड हे एक. संस्थांनचे कोणतेही कार्यक्रम असो, लग्न किंवा मुंज असोत, त्यावेळी राजाचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे शाही कपडे शिवण्याची जबाबदारी घोंडी गायकवाड यांच्याकडेच असे.

सलग तीन पिढ्या त्यांनी पटवर्धन संस्थानिकांच्या विविध समारंभाचे आणि नैमित्तिक कार्यक्रमातही शाही कपडे शिवून दिले. धोंडी कृष्ण गायकवाड हे मराठा समाजातले एक बडे प्रस्थ होते. त्यांनी मुंबई येथून शिलाई शिक्षणाचा लंडन डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यामुळे त्यांना त्यावेळची इंग्रजी पद्धतीची आणि शाही पद्धतीचे कपडे शिवण्याची कला अवगत झाली होती.

लंडन डिप्लोमा घेतल्यानंतर ते मिरजेत आले. त्यांनी सन १९१४ मध्ये मिरजेत शनिवार पेठेत महाराष्ट्र टेलरिंग फर्म या नावाने शिलाईचे दुकान सुरू केले. त्यांच्या दर्जेदार शिलाईमुळे ग्राहकांची मोठी गर्दी दुकानात होऊ लागली. पुढे लक्ष्मी मार्केटच्या स्थापनेनंतर धोंडी गायकवाड यांनी श्रीमंत बाळासाहेब यांच्या प्रयत्नाने मार्केटच्या आवारात एक दुकान घेतले. हे दुकान आजही अस्तित्वात आहे.

मिरजेचे तत्कालीन राजसाहेब श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन हे धोंडी गायकवाड यांच्याकडूनच आपले कपडे शिवून घेऊ लागले. या काळात मिरज शहर आणि परिसरात मोठे शाही कार्यक्रम होत, ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या भेटीचे सोहळे होत. या कार्यक्रमासाठी लागणारे विशिष्ट प्रकारचे कपडे हे धोंडी गायकवाड राजपरिवाराला शिवून देत असत. त्यांच्या शिलाईमुळे राज्यपरिवार खुलून दिसत असे.

पटवर्धन संस्थानिकांच्या लग्न मुंजी व अन्य सण, उत्सव प्रसंगी लागणारे कपडे घोंडी गायकवाड शिवून देत. श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन यांनी आपल्या हयातीत अन्य कुठल्याही शिंप्याकडे आपले कपडे शिवण्यास दिले नाहीत. इतका त्यांचा धोंडी गायकवाड यांच्यावर प्रचंड विश्वास होता. गायकवाड त्या विश्वासास पात्र राहून श्रीमंत बाळासाहेबांना हवे तसे कपडे शिवून देत.

श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र श्रीमंत नारायणराव तात्यासाहेब पटवर्धन यांनीही घोंडी गायकवाड यांच्याकडे कपडे शिवण्याची परंपरा पुढे सुरू ठेवली. नारायणराव पटवर्धन हे आधुनिक विचारांचे होते. त्यामुळे त्यांचा पेहरावडी आधुनिक होता. त्यांना आवश्यक कपडे धोंडी गायकवाड यांनी कमी वेळेत शिवून दिले होते.

नारायणराव यांनी धोंडी गायकवाड यांचे जाहीर कौतुकही केले होते. धोंडी गायकवाड यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र भगवंतराव यांनी शिलाईची परंपरा पुढे सुरु ठेवली. भगवंत गायकवाड यांच्या नंतर दत्तात्रय, बाळकृष्ण, सयाजीराव आणि विजय या चौघा भावंडांनी परंपरा सुरु ठेवली आहे.

Advertisement
Tags :

.