विश्व टेबट टेनिस फायनल्स स्पर्धेला आज प्रारंभ
वृत्तसंस्था / हाँगकाँग
येथे बुधवारपासून विश्व टेबल टेनिस फायनल्स स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत केवळ मिश्र दुहेरीत दिया चितळे आणि मनुष शहा भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या स्पर्धेने 2025 च्या टेबल टेनिस हंगामाचा समारोप होणार आहे.
सदर स्पर्धेमध्ये विविध देशांचे अव्वल आणि टॉपसिडेड टेबल टेनिसपटू सहभागी होत आहेत. पुरूष आणि महिलांच्या एकेरीतील अव्वल 16 स्पर्धक या स्पर्धेत भाग घेत असून मिश्र दुहेरीत मानांकनातील आघाडीच्या आठ जोड्या राहतील. दिया चितळे व मनुष शहा हे मिश्र दुहेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करतील. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच भारताचे हे दोन टेबलटेनिसपटू पात्र ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या विविध स्पर्धांमध्ये दिया आणि मनुष या भारतीय जोडीने आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. ब्राझीलमध्ये झालेल्या विश्व टेबल टेनिस स्पर्धेत दिया चितळे आणि मनुष शहा यांनी मिश्र दुहेरीत रौप्य पदक मिळविण्याचा नवा इतिहास घडविला.
बुधवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत मिश्र दुहेरीत सहभागी होणाऱ्या आठ जोड्या दोन गटात विभागण्यात येतील. दिया आणि मनुष यांचा गट एकमध्ये समावेश आहे. या गटामध्ये चीन, हाँगकाँग आणि भारताच्या जोड्यांचा समावेश आहे. गट ब मध्ये कोरिया, जपान, ब्राझील व स्पेन या देशांच्या जोड्या राहतील. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या द. कोरियाच्या लिम जाँग आणि बीन यांचा गट दोनमध्ये समावेश आहे. मिश्र दुहेरीमध्ये प्रत्येक जोडी दुसऱ्या जोडीबरोबर एकदा सामना करेल. त्यानंतर या दोन गटातील आघाडीच्या दोन जोड्या उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील.