विश्व नेमबाजी स्पर्धा ऑक्टोबरमध्ये
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा फेडरेशनच्या (आयएसएसएफ) विश्वचषक फायनल रायफल-पिस्तुल शॉटगन नेमबाजी स्पर्धा ऑक्टोबर महिन्याच्या मध्यंतरी दिल्लीतील कर्नीसिंग नेमबाजी संकुलात आयोजित केली आहे.
आयएसएसएफची ही पारंपरिक प्रतिष्ठेची स्पर्धा असून 2024 च्या हंगामातील ही शेवटची नेमबाजी स्पर्धा आहे. या स्पर्धेतील विविध नेमबाजी प्रकारातील विजेत्यांना रोख रक्कमेची बक्षीसे दिली जाणार आहेत. 37 देशांचे सुमारे 132 नेमबाज या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविणार असून त्यात किमान 8 विद्यमान ऑलिम्पिक पदक विजेत्या नेमबाजांचा समावेश राहिल. यजमान भारतातर्फे 23 नेमबाज या स्पर्धेत दाखल होणार आहेत. या स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाल्याने काही भारतीय नेमबाजांना या स्पर्धेसाठी थेट प्रवेश किंवा वाईल्ड कार्डव्दारे प्रवेश दिला जाईल.
2024 च्या नेमबाजी हंगामात आयएसएसएफतर्फे विविध ठिकाणी 6 विश्वचषक नेमबाजी स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. नेमबाजांच्या मानांकनातील अव्वल पहिल्या सहा नेमबाजांना त्याच प्रमाणे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्या नेमबाजांना, आयएसएसएफ विश्वचषक फायनल स्पर्धेतील चॅम्पियन्स आणि विद्यमान विजेत्यांना या स्पर्धेत थेट प्रवेश दिला जाणार आहे. नवी दिल्लीतील ही स्पर्धा विविध 12 प्रकारामध्ये घेतली जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय रायफल संघटनेचे अध्यक्ष कालिकेश नारायणसिंग देव यांनी दिली. चीन देशाचे 4 नेमबाज तसेच कारियाचे 6 अव्वल नेमबाज या स्पर्धेत सहभागी होत आहेत.