अल्कारेझ, मेदव्हेदेव दुसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था / बिजिंग
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या चायना खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनचा तृतिय मानांकित कार्लोस अल्कारेझ तसेच रशियाचा मेदव्हेदेव यांनी एकेरीत विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली आहे.
शुक्रवारी या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात अल्कारेझने पेरीकार्डचा 6-4, 6-4 अशा सरळ सेटसमध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. दुसऱ्या एका सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने फ्रान्सच्या अनुभवी आणि वयस्कर मोनफिल्सवर 6-3, 6-4 अशी मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. रोमन सैफुलीने स्वीसच्या वॉवरिंकाचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. सैफुलीनचा पुढील फेरीतील सामना इटलीच्या सिनेरबरोबर होणार आहे. त्याच प्रमाणे सहावा मानांकित मुसेटी आणि कॅचेनोव्ह यांनीही शानदार विजय नोंदविले.
महिलांच्या विभागात अमेरिकेच्या द्वितीय मानांकित जेसीका पेगुलाने विजयी सलामी देताना फ्रान्सच्या डायना पॅरीचा 6-1, 7-6 (7-4), व्हेरोनिका कुडेरमेटोव्हाने चीनच्या झीनयुचा 3-6, 6-4, 7-5, जपानच्या नाओमी ओसाकाने पुतीनसेव्हाचा 3-6, 6-4, 6-2, चीनच्या शुईने नेव्हारोचा 6-4, 6-2, डायना स्नेडरने सोफीया किनीनचा 6-2, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.
हुरकेज पराभूत
एटीपी टूरवरील जपानमध्ये सुरू असलेल्या जपान खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत द्वितीय मानांकित हुबर्ट हुरकेजचे आव्हान दुसऱ्या फेरीतच जॅक ड्रेपरने संपुष्टात आणले. ड्रेपरने हुरकेजचा 6-4, 6-4 असा पराभव केला. या स्पर्धेत टेलर फ्रिज आणि कास्पर रुड यांचे आव्हान पहिल्या फेरीतच यापूर्वी समाप्त झाले आहे. या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या बेन शेल्टनने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना मारियानो नेव्होनीचा 6-4, 6-3 असा पराभव केला.