विश्वविक्रमी शुभमन गिल!
सध्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेचा माहोल रंगू लागलाय अन् भारताला त्याचं तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका बजवावी लागेल ती धडाकेबाज फलंदाज शुभमन गिलला...त्याच्याविषयीच्या अपेक्षा वाढल्याहेत त्या इंग्लंडविरुद्धच्या झंझावाती तीन खेळींमुळं. याभरात त्यानं पहिल्या 50 ‘वनडे’ डावांमध्ये सर्वाधिक धावा जमविण्याचा विश्वविक्रम देखील नावावर जमा केलाय...गिलच्या सध्याच्या फॉर्मवर टाकलेला दृष्टिक्षेप...
चॅम्पियन्स चषक स्पर्धा बुधवारपासून सुरू झालीय आणि भारताच्या मोहिमेनं देखील गुरुवारी नारळ फोडलाय...‘तो’ स्पर्धेत कितपत यशस्वी ठरणार याचं उत्तर मिळेल ते येऊ घातलेल्या दिवसांत...पण हल्लीच सरावाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ‘त्यानं’ पुन्हा एकदा ‘त्याच्या’ कर्तृत्वाची झलक पेश केलीय...पहिल्या लढतीत 87, तर दुसऱ्या सामन्यात 60 धावा. त्यानंतर अहमदाबादमधील शेवटच्या लढतीत 14 चौकार नि तीन षटकारांच्या साहाय्यानं 102 चेंडूंत फटकावल्या 112...ते त्याचं एकदिवसीय क्रिकेटमधील सातवं शतक. त्याची ती भारतातील पाचवी शतकी खेळी अन् त्यानं दोन शतकांची नोंद केलीय ती न्यूझीलंडविरुद्ध, तर प्रत्येकी एक शतक झळकावलंय ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड नि झिम्बाब्वेविरुद्ध आणि हा भारतीय विक्रम...त्यानं एकदिवसीय लढतीतील पहिल्या 50 डावांचा विचार केल्यास विश्वविक्रम नोंदविलाय...शुभमन गिल !
गिल शतक तडकावल्यानंतर म्हणाला, ‘मला छान वाटतंय. हा माझ्या कारकिर्दीतील एक चांगला डाव. सुरुवातीला खेळपट्टीनं गोलंदाजाना साथ दिली आणि त्यामुळंच शतकाचं महत्त्व जास्त वाटतंय. इंग्लंडच्या गोलंदाजांचा चेंडू बऱ्यापैकी स्विंग होत असल्यानं एकेरी धावांवर जास्तीत जास्त भर देण्याचा निर्णय घेतला’...रोहित शर्मा लगेच परतल्यानंतर आठवतोय तो आठव्या षटकातील चौथा चेंडू. शुभमननं टप्प्याचा अंदाज घेतला अन् पुढं सरसावत ‘वाईड मिडऑन’च्या डोक्यावरून हाणला. त्यानं या फटक्याचा वापर बऱ्याच वेळा केला अन् साकिब मेहमूद व मार्क वूड या इंग्लिश जलदगती गोलंदाजांना अजिबात दाद दिली नाही...खरं म्हणजे सिडनीत झालेल्या पाचव्या कसोटीत गिलचा बळी मिळविण्याचं काम केलं होतं ते त्याच फटक्यानं. त्यावेळी यष्टिरक्षक कॅरीनं पहिलीच कसोटी खेळणाऱ्या वेबस्टरच्या चेंडूवर झेल पकडला होता...
पंजाबच्या संघातील त्याचे सहकारी सांगतात की, शुभमन गिल त्याचा कुठलाही फटका अंगलट आला म्हणून हाणणं बंद करत नाही. तो चुका शोधण्याचं काम सातत्यानं करतो नि सरावाच्या वेळी प्रत्येक हत्यार धारदार बनवितो...गिलनं सध्या लक्ष केंद्रीत केलंय ते खेळताना डोकं स्थिर राहील तसंच पायांच्या हालचाली व्यवस्थित होतील अन् शरीराचा तोल राखला जाईल यावर...त्याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय लढतींत शतक पूर्ण करणं जमलेलं नसलं, तरी तिसऱ्या सामन्यात तो हा टपा न चुकण्याची काळजी घेईल याची सहकाऱ्यांना पूर्ण खात्री होती...
शुभमन गिलच्या क्रिकेटच्या सर्व प्रकारांतील मागच्या 10 सामन्यांचा विचार केल्यास त्यांची कामगिरी राहिलीय ती संमिश्रच...इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याचा फॉर्म हा फारसा प्रभावी राहिला नव्हता अन् दीर्घ प्रकारातील अपयशानं त्याला बरंच छळलं होतं...तो रणजी चषक स्पर्धेत पंजाबतर्फे कर्नाटकविरुद्ध खेळला होता अन् पहिल्या डावात अवघ्या 4 धावा काढून परतल्यानंतर दुसऱ्या डावामध्ये त्यानं 102 धावांची खेळी केली होती...मात्र गिलला सर्वांत खराब टप्पा पाहायला मिळाला तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटींत. त्यात त्याला पाच डावांमध्ये 18.60 च्या सरासरीनं जमविता आल्या अवघ्या 93 धावा आणि एकही अर्धशतकं फटकावणं शक्य झालं नाही...
मात्र मागील 10 सामन्यांतील सुरुवातीच्या तीन लढती त्याच्यासाठी इतक्या खराब राहिल्या नव्हत्या. ऑस्ट्रेलियातील मालिका सुरू होण्यापूर्वी प्राईम मिनिस्टर्स इलेव्हनविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात त्यानं नाबाद अर्धशतक झळकावलं होतं...शिवाय या दौऱ्यापूर्वीच्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मुंबईतील अंतिम सामन्यात तो 90 धावांचा अप्रतिम डाव खेळला. दुसऱ्या डावात मात्र एक धाव काढून त्याला परतीचा मार्ग पकडावा लागला. त्याआधी पुण्यातील दुसऱ्या कसोटीत त्याला काढता आल्या त्या फक्त 30 नि 23 धावा...
या पार्श्वभूमीवर तज्ञांनी चॅम्पियन चषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी शुभमन गिलनं केलेल्या फलंदाजीला बरंच महत्त्व दिलंय...‘आम्ही प्रत्येक डावानंतर फलंदाजांचे दोष काढण्याचं प्रयत्न करतो. परंतु सध्या तो फक्त 25 वर्षांचा असून फार मोठी कारकीर्द त्यांच्यापुढं उभी आहे. शुभमन एकदिवसीय सामन्यांत यशस्वी ठरलाय अन् त्याच्याकडे क्षमता आहे ती कसोटीत देखील तशाच पद्धतीनं खेळण्याची. भारतातील क्रिकेट रसिकांनी सर्व तरुण खेळाडूंचं सातत्यानं समर्थन करण्याची वेळ आलीय’, त्यांचं मत...तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘गिलबरोबर फलंदाजी करणं मला नेहमीच आवडलंय. कारण तो समोरचा फलंदाज कुठल्या प्रकारे खेळतो याकडे अजिबात लक्ष देत नाही’...
चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताच्या पहिल्या सामन्याच्या दिवशीच शुभमनला प्राप्त झालंय ते ‘आयसीसी’च्या एकदिवसीय क्रमवारीतील अग्रस्थान. ते मिळविताना त्यानं खाली ढकललंय पाकिस्तानच्या बाबर आझमला (गिलनं पहिल्या 50 एकदिवसीय सामन्यांत काढल्याहेत त्या 2587 धावा, तर बाबरनं 2128 धावा)...‘उपकर्णधारपद सांभाळणारा गिल हा खूप दर्जेदार खेळाडू. त्याच्या क्षमतेविषयी कधीच शंका नव्हती’, असं रोहित म्हणतो ते उगाच नव्हे...अशा परिस्थितीत अपेक्षा आहे ती शुभमन गिलनं चॅम्पियन्स चषकात आपल्या या गुणवत्तेला पुरेपूर न्याय देण्याची !
शुभमनचे पराक्रम...
- अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हा शुभमन गिलचा अत्यंत आवडता असावा...तिथं त्यानं क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपांत शतकाची नोंद केलीय. असा विक्रम फाफ ड्यू प्लेसिसनं जोहान्सबर्ग, डेव्हिड वॉर्नरनं अॅडलेड, बाबर आझमनं कराची अन् क्विंटन डी कॉकनं सेंच्युरियन इथं साजरा केलाय...
- शुभमनला आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिल्या 1000 धावा पूर्ण करण्यासाठी गरज पडली ती 19 डावांची. तो पाकिस्तानच्या इमाम-उल-हकसह दुसऱ्या क्रमाकावर असून 18 डावांत हे लक्ष्य गाठणारा पाकिस्तानचाच फाखर झमान आहे तो पहिल्या क्रमांकावर...
- त्यानं एकदिवसीय सामन्यांतील 2000 धावांचा टप्पा गाठला तो 38 व्या डावांत. हा विश्वविक्रम असून त्यानं त्यावेळी सुद्धा 40 डावांमध्ये 2000 धावांचं लक्ष्य गाठणाऱ्या हाशिम अमलाला मागं टाकलं होतं...
2023 नंतर पुन्हा अव्व्वल स्थान...
- गेल्या काही वर्षांत शुभमन गिल हा भारताचा सर्वांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांपैकी एक फलंदाज राहिलाय अन् तो दिवसेंदिवस बलवान होत चाललाय...2023 मध्येही तो एकदिवसीय क्रमवारीत अग्रक्रमांकावर जाऊन बसला होता आणि आता त्यानं त्याची पुनरावृत्ती घडविलीय....
- विश्वचषक स्पर्धा झालेल्या 2023 सालामध्ये गिलनं 1584 धावांसह सर्वाधिक धावा जमविण्याचा मान मिळविला आणि विराट कोहली (1377) नि रोहित शर्मा (1255) यासारख्या दिग्गज खेळाडूंना देखील मागं टाकलं. खरं तर विश्वचषकाच्या सुऊवातीवेळी त्याला डेंग्यूचा सामना करावा लागला होता अन् त्यामुळं तो सर्वोत्तम सुरात दिसला नव्हता. तरीही त्यानं स्पर्धेतील 9 सामन्यांमध्ये 44 पेक्षा जास्त सरासरीनं 354 धावा काढल्या...
पहिल्या 50 डावांतील सर्वोत्तम कामगिरी...
- फलंदाज देश धावा सर्वोच्च सरासरी शतकं अर्धशतकं स्ट्राईक रेट
- शुभमन गिल भारत 2587 208 60.16 7 15 101.93
- हाशिम अमला दक्षिण आफ्रिका 2486 140 55.24 8 14 92.51
- इमाम-उल-हक पाकिस्तान 2386 151 54.22 9 12 82.76
- फाखर झमान पाकिस्तान 2262 210 49.17 6 13 97.12
- शाय होप वेस्ट इंडिज 2247 170 51.06 6 10 76.35
- झहीर अब्बास पाकिस्तान 2234 123 50.77 7 10 85.62
- राजू प्रभू